सव्वा वर्षांत पिंपरी विभागाने बदलले १८७०० वीज मीटर | महावितरणचा महाघोटाळा ; वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग?

रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी : वीज बिलात तोडपाणी करत वीज मीटरच गायब करणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. सुमारे सव्वा वर्षांच्या काळात महावितरणच्या पिंपरी विभागीय कार्यालयातून १८ हजार ७७० वीज मीटर बदलून दिले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा महावितरणचा महाघोटाळा असून यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याची शक्यता माहिती अधिकार कार्यकर्ते राजेश रोचिरमानी यांनी व्यक्त केली आहे.

याबाबत लोकमराठी न्यूजशी बोलताना रोचिरमानी म्हणाले की, कोरोना काळात अंदाजे रिडींगद्वारे आलेल्या अव्वाच्या सव्वा बिलात तोडपाणी करत पिंपरीतील महावितरणचे काही अधिकारी व कर्मचारी वीज मीटर गायब करतात, त्यांचा हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी मी स्वतः बळीचा बकरा झालो. त्यासाठी माझेही जास्त आलेले बिल कमी करून देण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांना १० हजार रूपये दिले. त्यांनी माझाही मीटर गायब करून मला थेट वीज जोडणी दिली. मात्र, मी पुर्वी केलेल्या अर्जांची माहिती त्यांना मिळताच त्यांनी मलाच अडकवण्याचा डाव आखत माझ्या घरावर धाड टाकली, आणि चोरीची वीज वापरतो म्हणून पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र, त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी मला थेट वीज जोडून दिली असल्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग दाखवल्यावर त्यांच्याच पायाखालची माती सरकली. माझ्यावर गुन्हा दाखल न करता ३७९० रूपये बील आकारले, ते मी भरून टाकले. परंतू त्यानंतर वीज चोरी तडजोड आकार १४,००० रूपये भरण्यास सांगितले. या आकाराची मी सविस्तर माहिती मागितली असता, ती रक्कम दुसर्‍याच व्यक्तीकडून भरून घेतली.

रोचिरमानी पुढे म्हणाले की, अशा पद्धतीने किती लोकांना बिलात तडजोड करून वीज मीटर बदलून दिले आहेत. याची माहिती आरटीआयच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला असता, १८,७७० मीटर बदलून दिले असल्याचे समोर आले. त्यापैकी ३२ मीटरचे बदलण्याचे कारणच देण्यात आलेले नाही. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता असून एवढा मोठा घोटाळा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशिर्वादानेच होऊ शकतो. त्यामुळे याबाबत महावितरणच्या पिंपरी विभागाचे कार्यकारी अभियंता व पुणे प्रादेशिक कार्यालयाचे अधिक्षक अभियंता यांना पत्र देऊनही काहीच कार्यवाही होताना दिसत नाही.

18,770 पैकी बदलण्याची कारणे व आकडे

सदोष – 9673

रिप्लेसमेंट ड्राईव्ह – 3712

जळाले – 2056

डिस्प्ले फेल – 2082

ग्राहकांची मागणी – 406

टेस्टिंग – 39

चोरी – 28

फास्ट – 232

स्लो – 502

ग्राहकांच्या मागणी केल्यानंतर नियमांचे पालन करून मीटर बदलले जातात. तसेच महावितरण प्रत्येक रूपयांचा हिशोब ठेवते. बिलात तडजोड करणे शक्य नाही. – निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण