पिंपरी चिंचवड शहरात मुस्लिम समाजाने राजकीय अस्तित्व निर्माण करावे – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

पिंपरी चिंचवड शहरात मुस्लिम समाजाने राजकीय अस्तित्व निर्माण करावे - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर
  • प्रस्थापितांची गुलामी करण्यापेक्षा, नेतृत्वाची क्षमता दाखवून द्या – सिद्दीक शेख

पिंपरी, ता. ७ : स्थानिक पातळीवर मुस्लिमांचे अनेक प्रश्न आहेत. मुस्लिम (Muslim) बांधवानी आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा पिंपरी चिंचवड शहरात मुस्लिम समाजाने स्वतःचेच राजकीय अस्तित्व निर्माण करावे. समाजातील न्यायासाठी रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या कर्तृत्वान मुस्लिम तरुणांना पुढे आणून त्यांना नेतृत्व करण्याची संधी द्यावी. अशा तरुणांच्या पाठीशी आम्ही आपली ताकद उभी करून परिवर्तन घडवू. असे प्रतिपादन राज्यघटनेचे अभ्यासक व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Adv Prakash Ambedkar) यांनी येथे केले.

पिंपरीतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात शनिवारी (ता. ६) सकाळी ११ वाजता मुस्लिम समाजाच्या स्थानिक प्रश्नांविषयी संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शहरातील मुस्लिम बांधवांशी मोकळा संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. अ‍ॅड. आंबेडकरांनी मुस्लिम बांधवांशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केल्याने अतिशय कमी वेळेमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमामध्ये हाजी गुलजार शेख, अमीर हमजा शेख, मौलाना अकबर मिल्ली, हाजी गुलाम रसूल, कारी इकबाल, सिद्दीक शेख यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास शहरातील मस्जिद प्रमुख, मौलाना, काझी, मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष जोगदंड, संजय ठोंबे, अ‍ॅड. फारुख शेख, हाजीमलंग शेख, तहसीन खान आदींनी सहकार्य केले.

आजच्या देशातील राजकीय पक्षांच्या बाबतीत बोलताना अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ” केंद्र सरकार (Central government) विरोधकांना विविध केंद्रीय यंत्रणेद्वारे संपविण्याचा प्रयत्न करीत असून, सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते ईडीच्या (ED) रडारवर आहेत. अशावेळी ते स्वतःला वाचवतात कि, जनतेला हा मोठा प्रश्न आहे.”

अ‍ॅड. आंबेडकर पुढे म्हणाले की, ” मुस्लिम समाजची अवस्था अतिशय बिकट असून त्यांची सुरक्षितता हा मुद्दा प्रामुख्याने पुढे येत आहे. एनआरसी, सीएए (NRC&CAA) यांसारख्या कायद्यांच्या माध्यमातून त्यांची नागरिकतेवर (Citizenship) प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न होत आहे.”

यावेळी बोलताना अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख म्हणाले की, ” या देशात मुस्लिम भाडेकरू नसून हक्कदार आहेत. स्वातंत्र्यसंग्रामात हजारो मुस्लिमांनी आपले बलिदान दिले आहे. आजही मुस्लिम समाज विविध क्षेत्रामधून देशाच्या विकासामध्ये हातभार लावत आहे. परंतु मुस्लिमांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे. पिंपरी चिचंवड शहरामध्ये शाळा, सांस्कृतिक भवन, वक्फच्या जमिनी, कब्रस्तान यांसारख्या अनेक समस्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. प्रस्थापित राजकीय पक्षांनी फक्त मुस्लिमांचा व्होटबँक म्हणून वापर केला. आज शहरामध्ये एकही मुस्लिम नगरसेवक नाही त्यामुळे प्रस्थापितांची गुलामी करण्यापेक्षा समाजातील होतकरू तरुणांना पाठबळ देऊन संविधानवादी लोकांना सोबत घेऊन स्वतःची क्षमता सिद्ध करून दाखवावी.” असे मत त्यांनी व्यक्त केले.