कारवाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना दारुच्या दुकानात डांबले

वल्लभनगरमधील हिरामोती वाईन्स दुकानातील प्रकार

कारवाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना दारुच्या दुकानात डांबले

पिंपरी चिंचवड : प्लास्टिक पिशव्या वापरणा-या व्यवसायिकांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागातील काही कर्मचा-यांना मद्य विक्रीच्या दुकानात दुकानमालकाने डांबून ठेवले. हा प्रकार वल्लभनगर एसटी बस स्थानकाच्या समोरील हिरामोती वाईन्स शॉपी येथे शुक्रवारी (ता. 27) दुपारी बाराच्या सुमारास घडला.

सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दुकानमालक संतोष रमेश शिरभाते (वय 46) आणि रमेश शिरभाते (वय 65, दोघे रा. वल्लभनगर, पिंपरी) यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सुनिल हरिश चौहान (वय 54, रा. प्राची अपार्टमेंट, आनंद सिनेमा शेजारी, घोरपडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात प्लास्टिक विरोधी कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास आरोग्य निरीक्षक मानमोडे, डवरी, चव्हाण यांच्यासह कर्मचारी उमेश जाधव, गणेश थरकुडे, राकेश चंडालिया, संतोष कदम, राहूल बोटे आदी कर्मचारी वल्लभनगर येथील एसटी बस स्थानकासमोरील हिरामोती वाईन्स शॉपी या दुकात गेले. त्याठिकाणी त्यांना प्लास्टिक पिशव्या वापरत असल्याचे निदर्शनास आले.

पालिकेचे कर्मचारी अल्याचे समजताच दुकानमालक संतोष शिरभाते आणि रमेश शिरभाते यांनी पालिकेच्या कर्मचा-यांशी अरेरावी केली. त्यांना उलट विचारना करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. दरम्यान, त्यांनी कर्मचा-यांशी धक्काबुक्की करून त्यांना दुकानात डांबून ठेवले. त्यावर कर्मचा-यांनी पोलिसांना संपर्क साधून माहिती सांगितली. त्यावर पोलीस त्याठिकाणी आले. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

कारवाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना दारुच्या दुकानात डांबले