महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. कैलास जगदाळे

महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. कैलास जगदाळे
डॉ. कैलास जगदाळे

पिंपरी : येथील रयत शिक्षण संस्था, महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. कैलास जगदाळे कला व वाणिज्य महाविद्यालय, पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा येथून नुकतेच रुजू झाले आहेत. प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे यांनी रयत शिक्षण संस्थेत २२ वर्षे वनस्पतीशास्त्र या विषयाचा विद्यार्थी प्रिय व अभ्यासू प्राध्यापक म्हणून नावलौकिक मिळवला. याचीच दखल म्हणून रयत शिक्षण संस्थेने २० सप्टेंबर, २००७ रोजी प्राचार्यपदी त्यांची नियुक्ती केली.

गेल्या १५ वर्षांपासून एक कार्यक्षम प्राचार्य म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा, लोणंद, मंचर, उंब्रज, पुसेगाव या ठिकाणी त्यांनी कार्य केले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणात्मक, मूल्यात्मक, ज्ञानात्मक व विवेकवादी विचार रुजविण्याचा प्रयत्न ते करीत आहेत.

आपत्कालीन व्यवस्थापन, प्रशिक्षण, सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट, रेमेडीयल कोचिंग, विवेकवाहिनी अंतर्गत व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, रोजगार भरती मेळावे, राष्ट्रीय एकात्मता, समान संधी, आदिवासी विकास, सामाजिक न्याय, मतदान जनजागृती, युवा महोत्सव, स्पोकन इंग्लिश सारखे कोर्सेस विद्यार्थ्यांना जीवनात उभे राहण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण आणि फलदायी ठरले आहेत.

एक प्राचार्य व कुशल प्रशासक म्हणून कार्य करीत असताना ११ व्या व १२ व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत महाविद्यालयांसाठी सहा कोटी रुपये अनुदान मिळविले आहे. याबरोबरच युजीसी, भारत सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाकडून आणि विद्यापीठाकडून निधी मिळवून महाविद्यालयांच्या अंतर्बाह्य विस्तारीकरणाचे कार्य केले आहे. स्वतंत्र पदव्युत्तर व संशोधन विभाग, मुलांचे व मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा, सुसज्ज प्रशासकीय कार्यालय, सेमिनार हॉल, लँग्वेज लॅब, बी.बी.ए.(सी.ए.) साठी संगणक प्रयोगशाळा, समुपदेशन केंद्र, आय.सी.टी. बेस्ड क्लासरूम, व्हर्च्युअल क्लासरूम अशी वैविध्यपूर्ण कामे बदलत्या काळाची आव्हाने ओळखून त्यांनी केली आहेत.

रयत शिक्षण संस्था, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे विविध समित्यांवर त्यांनी कार्य केले आहे. अध्ययन, अध्यापनाची आणि संशोधनाची दृष्टी असलेल्या प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे यांनी आठ पुस्तकांचे लेखन केले आहे व पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अभ्यासमंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांच्या या एकूणच कार्याची दखल घेऊन पुणे महानगरपालिकेने त्यांना आदर्श प्राचार्य म्हणून गौरविले आहे. माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, स्थानिक व्यवस्थापन समितीतील सर्व सदस्य, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक यांच्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

हे ही वाचा 👇