राम, कृष्ण, भीष्म म्हणजे हिंदू संस्कृती असेल तर…

राम, कृष्ण, भीष्म म्हणजे हिंदू संस्कृती असेल तर…

विश्वंभर चौधरी, ज्येष्ठ विचारवंत

भीष्मांना एक त्रासदायक वर मिळालेला होता. त्यांना आधीचे जन्म आठवत असत. भीष्मांचे एकूण ७३ पूनर्जन्म महाभारतात आहेत. माझा स्वतःचा पुनर्जन्मावर विश्वास नाही पण तूर्त आपण महाभारताच्या दृष्टीनंच महाभारताकडे बघू. तर भीष्म शरपंजरी पडले, म्हणजे टोचणाऱ्या बाणांवर झोपले. महाभारतातलं युद्धं तर १८ दिवसात संपलं पण भीष्मांना तब्बल ५८ दिवस शरपंजरी पडावं लागलं. सक्ती कोणाचीच नव्हती. भीष्मांना इच्छामरणाचं वरदान होतं.वाट्टेल तेव्हा ते प्राण सोडू शकत होते. पण शरपंजरी पडून भीष्मांनी शिक्षा भोगली. भीष्मांनी स्वतः दिलेली कारणं दोन. एक तर ५८ दिवसांनी उत्तरायण लागणार होतं. उत्तरायणात मरणं धर्माच्या दृष्टीनं उचित. दुसरं कारण फार वेगळं होतं.

भीष्मांना स्वतःच्या एका जन्मातल्या पापाची शिक्षा स्वतःहोऊन भोगायची होती. ७३ पैकी एका जन्मात भीष्म राजकुमार होते. एकदा जंगलातून जात असतांना त्यांचा रथ अचानक थांबला. समोर साप पडला होता. सापाची हालचाल होत नव्हती. भीष्मांना वाटलं साप मेला आहे. म्हणून त्यांनी त्याला बाणावर घेतलं आणि रस्त्यातून दूर फेकलं. साप काटेरी बाभळीवर पडला आणि अंगाला काटे टोचून मेला. सापाला फेकल्यावर भीष्मांच्या लक्षात आलं की ज्या अर्थी रथ थांबला म्हणजे रथाचे घोडे सापाला पाहून थांबले त्याअर्थी साप जिवंत असला पाहिजे कारण घोडे जिवंत प्राण्याला ओलांडून जात नाहीत. साप तर गेला पण स्वतःला त्याची शिक्षा म्हणून भीष्मांनी तेच सोसलं जे त्यांच्यामुळे सापाला भोगावं लागलं होतं. मरतांना काटेरी शैय्या! स्वतःच्या पापाची शिक्षा स्वतःला आत्मक्लेश करून घेणारे भीष्म पितामह.

राम, कृष्ण, भीष्म म्हणजे हिंदू संस्कृती असेल तर…

प्रभू रामचंद्रांचा मृत्यु कसा झाला? काळपुरूषानं अट घातली की तुमची (रामाची) आणि माझी भेट चालू असतांना तिसरा माणूस आत यायला नको. लक्ष्मण पहारा देत उभा होता. दुर्वास ॠषी आले आणि रामाच्या भेटीचा आग्रह धरू लागले. लक्ष्मण घाबरला. एकीकडे काळपुरूष आणि दुसरीकडे कोपायमान होऊन रामाला काहीही शाप देऊ शकणारे दुर्वास! लक्ष्मणानं काळपुरूषाला दिलेलं वचन विसरून आत प्रवेश केला.

काळपुरूषाला दिलेल्या वचनाचा भंग झाला म्हणून रामानंच लक्ष्मणाला स्वतःपासून कायमचं दूर जाण्याची शिक्षा दिली. ही शिक्षा म्हणजे मरणंच म्हणून लक्ष्मणानं शरयू नदीत देहत्याग केला, जलसमाधी घेतली. भावाचा वियोग आणि मृत्यूस स्वतःला जबाबदार धरून प्रभू रामचंद्रांनी जलसमाधी घेतली. स्वतःच्या गुन्ह्याची शिक्षा भोगणे. आत्मक्लेश.

भगवान श्रीकृष्ण. ‘जर’ नावाच्या पारध्याचा बाण पायात घुसून धनुर्वात झाला आणि कृष्णानं त्यातच देह ठेवला. पारधी घाबरला कारण त्यानं प्राणी असेल असं समजून बाण मारला होता. श्रीकृष्ण म्हणाला तुझं नियतीदत्त कर्तव्य तू केलंस. माझ्या संपूर्ण यादवकुळाचा यादवीतच नाश झाला आहे. जगून मी तरी काय करू? तूच मला मुक्ती दिलीस. धन्यवाद. मी तुला मोक्षाचा वर देतो.

रावण वधानंतर राम म्हणाले आमचं शत्रुत्व संपलं. रावणाला माझ्या हातून मरण आलं म्हणून मी मोक्षाचा वर देतो.

राम, कृष्ण, भीष्म म्हणजे हिंदू संस्कृती असेल तर प्रायश्चित्त आणि क्षमा हे दोन मुख्य गुण आपल्यात आहेत का हे एकदा कथित हिंदुवाद्यांनी तपासून पहावं. तपासल्यावर ते हिंदूंच नाहीत हे त्यांच्या लक्षात येईल!