
- महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सायली नढे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
पिंपरी, दि. ५ (प्रतिनिधी) – महापालिकेच्या आरोग्य विभाग व वैद्यकीय विभागामधील कंत्राटी कामगारांना आरोग्य विमा कवच तसेच महापालिकेच्या सर्व हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळावेत. अशी मागणी पिंपरी चिंचवड महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सायली नढे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
याबाबत नढे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या खूप झपाट्याने वाढत आहे, ते पाहता महापालिकेने वैद्यकीय सेवा व आरोग्य सेवांमध्ये बदल करून कंत्राटी कामगारांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे नागरिकांना सेवा प्रदान करण्यामध्ये कोणतीही अडचण येत नाही. वैद्यकीय सेवा व आरोग्य सेवा हे अत्यावश्यक सेवेमध्ये येतात. तसेच सर्व कंत्राटी कामगार आपल्या जीवाची परवा न करता शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा व वैद्यकीय सेवा प्रदान करतात. अशातच निसर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संसर्गजन्य रोग निर्माण होतात, त्यामुळे कामगारांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये महापालिकेत वैद्यकीय सेवा व आरोग्य सेवामध्ये कंत्राट पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्व महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळावेत. तसेच अनेक शस्त्रक्रिया व तपासणी महानगरपालिका रुग्णालयामध्ये होत नाहीत. त्यामुळे या कामगारांना खूप अडचणी निर्माण होतात. त्याकरिता सर्व कंत्राटी कामगारांना सुरक्षा विमा कवच देण्यात यावे. असे अध्यक्षा सायली नढे यांनी निवेदनात नमुद केले आहे. यावेळी माजी सभापती शिक्षण मंडळ अभिमन्यू दही तुले, स्वाती शिंदे, प्रियंका सगट,आशा भोसले, प्रज्ञा जगताप,आबा खराडे उपस्थित होते