राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

सतरा शहरांचे तापमान चाळिशीपार

राज्यात तापमानातील वाढ कायम असून, एकूण सतरा महत्त्वाच्या शहरांतील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून, बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत तीन ते चार अंशांनी वाढला असल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पुढील दोन दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यात या आठवडय़ाच्या सुरुवातीपासूनच कमाल आणि किमान तापमानात झपाटय़ाने वाढ सुरू झाली. मागील तीन ते चार दिवसांपासून तापमानातील वाढ कायम आहे. नगर येथे गुरुवारी राज्यातील उच्चांकी ४२.३ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ सोलापूर येथे ४२.२ तापमान नोंदविण्यात आले. या दोन्ही शहरांसह जळगाव, मालेगाव, सांगली, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ आदी ठिकाणी तापमान ४० ते ४१ अंशांवर पोहोचले आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, नागपूर, वाशिम आदी ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे या भागात उन्हाची तीव्रता अधिक आहे. मुंबई, सांताक्रुझ, अलिबाग, रत्नागिरी आदी कोकण विभागांतील प्रमुख ठिकाणी कमाल तापमान ३२ ते ३३ अंशांपर्यंत नोंदविले जात आहे.

राज्यात पुढील चार ते पाच दिवस उन्हाचा चटका आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे शनिवारपासून कोकण विभाग वगळता इतर ठिकाणी पावसाला पोषक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि उस्मानाबाज जिल्ह्यत काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.