पुणे (लोकमराठी) : पुणे शहर आणि परिसरातील दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा यंदाच्या हंगामात प्रथमच चाळिशीपार गेला आहे. रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाल्याने पुणेकरांना दिवसा घरातही उन्हाच्या झळा आणि रात्री उकाडय़ाचा सामना करावा लागतो आहे. वाढलेल्या तापमानासह थंडावा मिळविण्यासाठी घरातील वातानुकूलित यंत्र आणि पंख्यांचा वापर वाढला आहे. तापमानातील ही वाढ कायम राहणार असून, पुढील आठवडाभर दिवसाच्या तापमानाचा पारा ४० ते ४१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.
पुणे शहरासह परिसरामध्ये एप्रिलच्या सुरुवातीपासून तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. गेल्या आठवडय़ात दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा ३८ ते ३९ अंश सेल्सिअसच्या आसपास होता. याच कालावधीत राज्यात कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव वाढल्याने ढगाळ स्थिती निर्माण झाली. त्यात शहराच्या काही भागांत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रात्रीच्या किमान तापमानात मोठय़ा प्रमाणात वाढ होऊन उकाडा वाढला. गेल्या चार ते पाच दिवस दिवसाच्या तापमानाचा पारा ३९ अंशांच्या आसपास होता. गुरुवारी (ता. 16 एप्रिल) दिवसाच्या तापमानात वाढ होत तो ४०.१ अंश सेल्सिअसवर पोहोचला. दिवसाचे हे तापमान सरासरीच्या तुलनेत २.३ अंशांनी अधिक आहे. रात्रीच्या किमान तापमानातही झपाटय़ाने वाढ झाली. गुरुवारी तब्बल २३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीच्या तुलनेत ३.३ अंश सेल्सिअसने अधिक आहे.
सध्या शहर आणि परिसरात टाळेबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना घरी राहण्याशिवाय पर्याय नाही. दुपारी घराबाहेर उन्हाचा चटका वाढला आहे. परिणामी घरातही गरम झळा जाणवत आहेत. अशा स्थितीत घरातील पंख्यांचा वेग वाढला आहे.
त्याचप्रमाणे वातानुकूलित यंत्रणाही कमीत कमी तापमानात ठेवली जात आहे. त्याचप्रमाणे थंड पाणी आणि पदार्थासाठी फ्रीज किंवा इतर उपकरणाचा वापरही वाढला आहे.
हलक्या पावसाची शक्यता
पुणे आणि परिसरातील तापमानात वाढ होत असताना ढगाळ स्थितीही निर्माण झाली आहे. या आठवडय़ात शहरात काही ठिकाणी पावसाने हजेरीही लावली. पुढील आठवडाभर शहरात कधी ढगाळ, तर कधी निरभ्र आकाशाची स्थिती राहणार आहे. पुढील एक-दोन दिवस काही भागांत हलका पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आठवडाभराच्या कालावधीत शहरातील कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या आसपास राहणार आहे. रात्रीचा उकाडाही वाढणार असून, किमान तापमान २३ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.
तापमानातील वाढ
दिनांक कमाल किमान
१० एप्रिल ३८.१ १८.८
११ एप्रिल ३८.४ २१.०
१२ एप्रिल ३९.१ २२.४
१३ एप्रिल ३९.७ २२.३
१४ एप्रिल ३९.१ २२.०
१५ एप्रिल ३९.८ २१.८
१६ एप्रिल ४०.१ २३.०
(अंश सेल्सिअस)