पत्नीशी भांडण केल्यास होऊ शकते विलगीकरण

पत्नीशी भांडण केल्यास होऊ शकते विलगीकरण

पुणे (लोकमराठी) : टाळेबंदीमुळे घरात पती-पत्नी यांच्यात सतत भांडणे होत असल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत पत्नीशी भांडण करणाऱ्या पतीला आता विलगीकरणाची शिक्षा देण्यात येणार आहे. कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण भागात ही नवी क्लृप्ती राबविण्यात येत आहे.

टाळेबंदीत आता जोडप्यांची भांडणे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घरामध्ये पती आणि पत्नीची सतत भांडण होत असल्याचे समोर आले आहे. पत्नीशी भांडणाऱ्या पतीला समज देण्यात येईल आणि तरीही त्याने ऐकलं नाही, तर थेट पोलिसांच्या मदतीने त्याचे संस्थात्मकरीत्या विलगीकरण करण्यात येणार आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या संदर्भात आदेश काढला आहे. टाळेबंदीच्या काळात घरामध्ये पती-पत्नी यांच्यातील वाद वाढल्याने असा आदेश काढावा लागला, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सध्या संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये नियमांचे पालन काटेकोरपणे होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

पती-पत्नीमधील भांडणे सोडवून कौटुंबिक हिंसाचाराला प्रतिबंध करण्यासाठी गाव पातळीवर महिला दक्षता समितीची स्थापना करण्यात येणार आहे. ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्या, अंगणवाडी सेविका, बचत गट सांभाळणाऱ्या महिलांचा या समितीमध्ये समावेश आहे. भांडखोर नवऱ्याचे समुपदेशन करण्यासाठी जिल्हा पातळीवर हा नियम लागू करण्यात आला आहे.

खोलवर रुजलेली पुरुषप्रधानतेची भावना वा संशय या मानसिक आजारामुळे पती-पत्नीत भांडणे होतात. काही वेळा ती हिंसाचारापर्यंत पोहोचतात. त्यामुळे विलगीकरणाऐवजी समुपदेशन हा त्यावरचा मार्ग असू शकतो. – डॉ. हमीद दाभोलकर, मानसोपचारतज्ज्ञ