कामगारांची उपासमार टाळण्यासाठी सोनिया भोजन थाळी सुरू करण्याची मागणी

कामगारांची उपासमार टाळण्यासाठी सोनिया भोजन थाळी सुरू करण्याची मागणी

पिंपरी (लोकमराठी) : महाराष्ट्रात 23 मार्चपासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्रातील गरजु कष्टकरी कामगारांना त्यांच्या कुटुंबासहीत उपासमारीची वेळ आली आहे. तरी त्यांच्यासाठी किमान जेवणाची सोय व्हावी म्हणून ज्या पद्धतीने शिवभोजन व शरदभोजन थाळी सुरू करण्यात आली, त्याप्रमाणेच सोनिया भोजन थाळी सुरू करण्यात यावी. अशी मागणी पिंपरी चिंचवड असंघटित कामगार काँग्रेसचे सुंदर कांबळे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.

याबाबत कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोनिया भोजन थाळी सुरू केल्यास त्याचा फायदा आता कोरोनाच्या काळात कामगारांना होईल. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कष्टकरी कामगार वर्ग हा सर्वात जास्त काँग्रेसप्रेमी असून इंदिरा गांधी यांच्यापासून काँग्रेसने नेहमी कष्टकरी कामगार वर्गाचा विचार केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील असंघटित कामगाराच्या अडचणी लक्षात घेता, आपण सोनियाथाळी लवकरच सुरू कराल, अशी अपेक्षा कामगार वर्ग करत आहे.