प्रा. डॉ. संदीप वाकडे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांचा जन्म 31 मे इ.स. 1725 मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यामध्ये जामखेड (Jamkhed) तालुक्यातील ‘चौंडी’ या गावी झाला. पुढे होळकरशाहीचे संस्थापक सुभेदार मल्हारराव होळकर यांनी हुशार व ‘त’ म्हणता ताक ओळखणा-या चौंडीच्या मानकोजी पाटलांची (Mankoji Patil) लेक अहिल्यादेवी यांना आपली सून म्हणून होळकर घराण्यात आणले. पुढे मुळच्याच हुशार असलेल्या अहिल्यादेवी सासरे मल्हारराव (Malharrao) यांच्या पाठीमागे हळूहळू कारभार पाहू लागल्या. त्यांच्या या कर्तृत्वामुळे मल्हाररावही त्यांच्यावर हळूहळू एक-एक जबाबदारी टाकू लागले. असे सर्व सुरळीत चालले असता, कुंभेरीच्या (Kunbheri) वेढ्यात पती खंडेराव जेव्हा धारातीर्थी पडतात, तेव्हा अहिल्यादेवी यांना जबर धक्का बसतो. त्या पूर्णतः खचून जातात. होळकर घराण्यात आल्यापासून त्यांनी कितीतरी सुखदुःखाचे प्रसंग पाहिले होते पण ही घटना त्यांच्या हृदयात घर करून गेली. पतिनिधनानंतर अहिल्यादेवी सती जाण्यास निघतात, तेव्हा मल्हारराव त्यांना सती जाऊ देत नाहीत. अहिल्यादेवीही दुःख बाजूला सारून खंबीरपणे उभ्या राहतात, पण ख-या अर्थाने त्यांच्या आयुष्यात येथून पुढचा काळ संघर्षमय असाच होता. मल्हारराव मोहिमांवरती असत तर स्वतः अहिल्यादेवी त्यांच्या पाठीमागे कारभार पाहत होत्या. तेथील अनेक लहान मोठी प्रकरणे निकाली लावत होत्या. यातूनच रयतेच्या मनात त्यांनी आपले स्थान निर्माण केले होते. पुढे सासरे मल्हारराव होळकर यांचे निधन होते, त्यांच्या निधनाने अहिल्यादेवी यांचा आधारवड नाहीसा होतो. पुढे त्या दुःख विसरून आपल्या कारभारावर लक्ष केंद्रित करतात.
अहिल्यादेवी या पर्यावरणाला जपणा-या होत्या. त्या वृक्षाचे महत्त्व जाणणा-या होत्या. त्या वृक्षांना लेकराप्रमाणे जपत असत. ‘वृक्षांस तोडणे म्हणजे प्रजापीडणच’, असे त्यांना वाटत असे. त्यांनी आपल्या प्रजेमध्ये हुंडाबंदीसाठीही प्रयत्न केले. त्यांना हुंडा घेणे-देणे ही प्रथा मान्य नव्हती. म्हणून त्यांनी त्यावेळी हुंडाबंदी केली होती. आज एकविसाव्या शतकातही इतकी वर्षे उलटून गेली तरी अजूनही हुंडा घेण्या-देण्याची प्रथा नजरेस पडते, तर कुठे पतिव्रतेचा हुंड्यासाठी आजही छळ होताना दिसतो, हुंड्याअभावी लग्न मोडताना दिसतात, हे जर व्हायलाच नको असेल तर हुंडाबंदी कायमच झाली पाहिजे. यासाठी अहिल्यादेवी होळकर यांनी त्याकाळी आपल्या प्रजेत हुंडाबंदीचा कायदा केला होता, हा त्यांचा दूरदृष्टिकोन वाखाणण्याजोगा आहे. हुंड्याचे दुष्परिणाम हे त्यांनी त्याच वेळी ओळखले होते. यावरून त्यांची दूरदृष्टी दिसून येते. पण आजही एकविसाव्या शतकात ही प्रथा चालू असल्याचे निदर्शनास येते. हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
त्या आपल्या प्रजेतील विधवांना सन्मानाने जगता यावे, यासाठी त्यांना स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार देतात. त्यांना न्याय देतात. त्याकाळी स्त्रियांना सन्मानाने जगावयास लावण्याचा अहिल्यादेवींचा हा निर्णय त्या काळातील स्त्रियांची एकंदर परिस्थिती पाहता, स्त्रियांना समाजात असणारे दुय्यम प्रतीचे स्थान पाहता, वाटतो तितका सोपा नव्हता. पण अहिल्यादेवींनी याविरोधात ठामपणे पाऊल उचलल्याचे दिसते.
अहिल्यादेवी या धार्मिक होत्या पण धर्मांध नव्हत्या. त्यांनी स्वतःच्या धर्माचे हित जोपासताना इतर धर्माचाही आदर केला. आज आपण पाहतो धर्माधर्मात कशी तेढ निर्माण होत आहे. त्यातून माणसे कशी विखुरली जात आहेत. मात्र अहिल्यादेवी यांनी स्वधर्माबरोबरच इतर धर्माचाही केलेला आदर आजच्या धर्माधर्मात अपप्रचार करणा-यांना आदर्शवत असाच आहे.
अहिल्यादेवी होळकर या एखादी योजना प्रथमपासून ते शेवटपर्यंत राबवताना नेहमी दक्ष असत. आजच्या घडीला कित्येक योजनेतून होणारा भ्रष्टाचार, यामुळे बारगळलेली योजना, सर्वसामान्य लोकांना या योजनेचा न होणारा लाभ, यामुळे प्रजेचे अतोनात नुकसान होते. त्यांचे हे कार्य आजही सर्वांना दिशादर्शक आहे. त्यांनी भारतभर धर्मशाळा, अन्नछत्रे, बारव, तलाव, मंदिरांचे जीर्णोध्दार, पाणपोई, वृक्षारोपन इ. कितीतरी जनहिताची कामे केली. म्हणूनच पुराणामध्ये दानशूर म्हटले की महाभारतातील कर्ण आपल्यासमोर उभा राहतो. अगदी त्याचप्रमाणे इतिहासामध्ये अठराव्या शतकातील उदारमतवादी राज्यकर्त्या म्हटले की आपल्यासमोर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उभ्या राहतात. त्याचप्रमाणे प्रजेतील जे भिल्ल लोक होते. त्यांचा प्रजेतून जाणा-या – येणा-या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. हे भिल्ल लोक त्या प्रवाशांची, व्यापा-यांची लूटमार करत असत. हे सर्व थांबविण्यासाठी अहिल्यादेवींनी या लोकांच्या पोटापाण्याची कायमची व्यवस्था केली. त्यांनी त्या भागातून जाणा-या – येणा-यांकडून ‘भिलकवडी’ नावाचा कर घेण्यास त्यांना परवानगी देऊन, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी जमिनीही दिल्या व येणा-या-जाणा-यांच्या संरक्षणाची जबाबदारीही त्यांच्यावरच सोपविली. थोडक्यात त्यांनी लुटारूंनाच साक्षात रक्षक बनविले. याविषयी पाश्चात्य अभ्यासक जॉन माल्कम असे म्हणतात की, “समाजशास्त्र हा शब्दही पाश्चात्य जगाला परिचित नव्हता आणि ज्याला कुणी संरक्षण/ विश्वास देत नाही, तो दुस-याला संरक्षण देण्यास समर्थ असत नाही. हे समाजशास्त्रीय नैतिक सूत्रही लोकांना अवगत नव्हते, ते अहिल्याबाईंनी कसे अमलात आणले याचे मला फार आश्चर्य वाटते.”
अशा या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा सबंध जीवनपट पाहता त्यांना जीवनामध्ये करावा लागलेला संघर्ष हा प्रेरणादायी असाच आहे. अहिल्यादेवींना त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत कौटुंबिक व राजकीय स्वरूपाच्या संघर्षाला सामोरे जावे लागले. कुटुंबातील व्यक्तींचे मृत्यू, यामध्ये पती खंडेराव, सासू गौतमाबाईसाहेब, सासरे मल्हारराव होळकर, पुत्र मालेराव, सुना, नातू नथोबा, नातसुना, जावई व एकुलती एक कन्या मुक्ताबाईही सोडून जाते. पण दुःख करत बसण्यातल्या अहिल्यादेवी नव्हत्या. दुःख बाजूला सारून अहिल्यादेवी खंबीरपणे येणा-या संकटाला तोंड देण्यासाठी उभ्या राहतात. त्याचप्रमाणे राजकीय स्वरूपाचेही संघर्ष त्यांच्या वाट्याला आले आहेत. यामध्ये दिवाण गंगोबा तात्यांचे राघोबादादांकरवी होळकरांची दौलत समेटण्यासाठी चाललेले प्रयत्न, चंद्रावत राजपुतांनी केलेले बंड अशा राजकीय स्वरूपाच्या संघर्षावर मात करून त्या सहीसलामत बाहेर पडतात. अर्थात त्यांना यासाठी प्रचंड संघर्षाला सामोरे जावे लागले होते. त्या काळात एक स्त्री म्हणून अहिल्यादेवी एवढी सगळी परिस्थिती हाताळतात असे उदाहरण सापडणे दुर्मिळच! म्हणूनच त्यांचा हा संघर्ष आजच्या स्त्रीला प्रेरणादायी असाच आहे. एकूणच आनंदाचे प्रसंग त्यांच्या जीवनात फार कमी असून, जास्त करून दुःखमय प्रसंगच त्यांच्या वाट्याला आलेले दिसतात.
एकूणच संघर्ष हेच अहिल्यादेवी यांचे दुसरे जीवन म्हणता येईल. अहिल्यादेवींना पती खंडेराव (Khanderao) यांची पत्नी म्हणून, एका सुभेदारांची सून म्हणून, एका सुभेदारांची आई म्हणून, तर रयतेच्या कैवारी म्हणून या सर्व भूमिकातून जाताना प्रचंड संघर्षाला सामोरे जावे लागल्याचे दिसते. अशा संघर्ष हेच दुसरे जीवन असणा-या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 13 ऑगस्ट 1795 मध्ये प्राणज्योत मालवली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या एकूणच जीवन कार्याचा वेध घेता एक कुशल प्रशासक, पुरोगामी विचार, उक्ती आणि कृती यांचा समन्वय, हुंडाबंदीविषयी सजग, कौटुंबिक आणि राजकीय पातळीवर वाट्याला येणा-या संघर्षावर मात, सर्वधर्मसमभाव, उदारमतवादी, स्त्रियांविषयी उदार दृष्टिकोन, निसर्गाविषयीचे भान व अन्यायाविरुद्ध बंड ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये दीपस्तंभासारखी दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहेत.
- प्रा. डॉ. संदीप वाकडे,
एस. एम. जोशी कॉलेज, - हडपसर, पुणे, मो. नं. ९४२०४६९२९०