पिंपरी चिंचवडमध्ये सैराटची पुनरावृत्ती | मागासवर्गीय तरूणाचा खून | आरोपींविरोधात ऍट्रासिटीसह खूनाचा गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवडमध्ये सैराटची पुनरावृत्ती | मागासवर्गीय तरूणाचा खून | आरोपींविरोधात ऍट्रासिटीसह खूनाचा गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड: प्रेमप्रकरणातून एका तरुणाचा खून करण्यात आला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात सहा जणांवर ऍट्रासिटीसह खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे सौदागर येथे रविवारी (ता. 7) रात्री घडली.

विराज विलास जगताप (वय 18) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा काका जितेश वसंत जगताप (वय 45, रा. जगताप नगर, बुद्ध विहार जवळ, पिंपळे सौदागर) यांनी सोमवारी (दि. 8) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तर हेमंत कैलास काटे, सागर जगदीश काटे, रोहित जगदीश काटे, कैलास मुरलीधर काटे, जगदीश मुरलीधर काटे, हर्षद कैलास काटे (सर्व रा. पिंपळे सौदागर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विराज याचे आरोपीच्या नातेवाईक तरुणीशी प्रेमसंबंध होते. या कारणावरून आरोपींनी आपसांत संगनमत करून रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील शिव बेकरीजवळ विराज हा दुचाकीवरून चालला असताना आरोपींनी त्याच्या दुचाकीला टेम्पोने पाठीमागून धडक दिली. तो खाली पडल्यानंतर त्याला मारण्यासाठी आरोपी खाली उतरले. यामुळे घाबरलेला विराज हा पळून जाऊ लागला. त्यावेळी हेमंत काटे याने लोखंडी रॉड विराजच्या डोक्‍यात मारला.

सागर काटे याने पाठीत दगड मारला. रोहित काटे, कैलास काटे, हर्षद काटे, जगदीश काटे यांनी विराजचे हातपाय पकडले. त्यावेळी आरोपी जगदीश याने जातीवाचक बोलून विराज यांच्या अंगावर थुंकला. ‘आमच्या जातीच्या मुलीवर प्रेम करण्याची तुझी लायकी आहे का’, असे म्हणत त्यास जबर मारहाण करून तिथेच सोडून दिले.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विराज यास खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक अजय भोसले याबाबत अधिक तपास करीत आहेत.