बोलावणे मिशनरीसेवा व्रताचे आणि पत्रकारीतेचे
कामिल पारखे
रविवारची मिस्सा संपल्यावर मी माझ्या वडिलांचे बोट धरून चर्चच्या समोरील मोकळ्या जागेत उभा होतो. देवळातून बाहेर पडणारे लोक आपसांत बोलत उभे होते. श्रीरामपूरला अलिकडेच बदली होऊन आलेले ते तरुण धर्मगुरू घोळक्याने उभे असलेल्या लोकांशी बोलत होते. फादर प्रभुधर यांचे व्यक्तिमत्व अगदी देखणे असेच होते. वक्तृत्वशैलीची देणगी लाभलेल्या फादरांच्या ओघवत्या उपदेशांनी लोक प्रभावित होत असत. भरपूर उंचीचे फादर आपल्या पांढऱ्या झग्यात फिरत होते, तसे त्यांना 'जय ख्रिस्त' म्हणून अभिवादन करण्यासाठी लोक त्यांच्याकडे वळत होते. आमच्याकडेही ते आले आणि माझ्या वडिलांशी बोलू लागले.
हरेगावचे मतमाऊली तीर्थक्षेत्र आणि (शेजारी) बल्गेरियाची राजधानी सोफिया येथे
बोलत असताना मध्येच थांबून माझ्याकडे पाहत त्यांनी विचारले, ''पारखे टेलर, तुम्हाला किती मुले आहेत? आणि त्यांच्यामध्ये याचा नंबर कितवा?''
माझ्या वडिला...