नाशिकचा भोंदू ‘कॅप्टन’, अंधश्रद्धा, अधिकचा हव्यास आणि सामाजिक मानसिकता…
सारंग अविनाश कामतेकर (मो.न. ९३७१०२४२४७)
'कॅप्टन' या नावाच्या एका तथाकथित ज्योतिष्याला नाशिक पोलिसांनी अटक केली. दैवी शक्ती आणि कर्मकांडांच्या नावाखाली त्याने एका महिलेचे वर्षानुवर्षे शोषण केल्याचा गंभीर आरोप या कॅप्टनवर आहे. या प्रकरणाचे काही वीभत्स व्हिडीओ विविध समाजमाध्यमांतून झळकले. पोलीस तपासात अशा प्रकारचे अजून ५०-१०० व्हिडीओ जप्त झाल्याचेही समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला व पुरोगामी महाराष्ट्रात तीव्र संताप पसरला.
राजकीय व्यक्तींसोबतच प्रशासकीय सेवेतील व उच्चभ्रू समाजातील अनेक जणांची या भोंदू बाबाशी जवळीक असल्याने या प्रकरणाची चर्चा जोरात सुरू आहे. सुशिक्षित व सुस्थितीत असलेल्या व्यक्ती अशा भोंदू बाबांच्या जाळ्यात कशा अडकल्या? याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. या घटनेकडे केवळ एक गुन्हेगारी प्रकार म्हणून बघून चालणार नाही; तर अशा घटना वारंवार का घ...









