माणूसपण जपणारी भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्वाची – स्वाती महाळंक

माणूसपण जपणारी भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्वाची - स्वाती महाळंक
स्वाती महाळंक यांचे स्वागत करताना संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे, यावेळी त्यांच्यासमवेत डावीकडून संस्थेचे संचालक संजय छत्रे व राजेश नागरे
  • यशस्वी एज्युकेशन’ सोसायटीच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित ‘संवाद शिक्षकांशी’कार्यशाळा संपन्न

पिंपरी, ता. ०५ सप्टेंबर २०२२ : माणूसपण जपणारी भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षकांची भूमिका खूप महत्वाची असून त्यादृष्टीने शिक्षकवर्गाने स्वतःला अद्ययावत करण्यासाठी प्रयत्नशील व्हायला हवे असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सेंटर फॉर इन्स्टिट्यूशनल बिल्डींग्स अँड लिडरशिप स्टडीजच्या कार्यकारी प्रमुख स्वाती महाळंक यांनी व्यक्त केले.

यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या वतीने चिंचवड येथे शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘संवाद ‘शिक्षकांशी’ या एकदिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या मनोगतातून विविध प्रसंग व घटनांचे दाखले देत विद्यार्थीनिष्ठ शिक्षक कसा असावा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

विद्यार्थी अभ्यासात उत्तमरीत्या उत्तीर्ण होणे हे जसे शिक्षकाचे आद्य कर्तव्य आहे, त्याचप्रमाणे तो विद्यार्थी एक उत्तम माणूस व आदर्श नागरिक बनावा यासाठी त्याच्यावर जीवनमूल्यांचे संस्कार स्वतःच्या आचरणातून घडवणे ही सुद्धा शिक्षकांचीच प्राथमिक जबाबदारी आहे, हे लक्षात घायला हवे असे महाळंक यांनी सांगितले.

आजच्या युवा पिढीसमोर असलेली आव्हाने लक्षात घेऊन त्यांना त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी, सक्षम बनवण्यासाठी शिक्षकांनी आपल्या अध्यापनशैलीत योग्य ते बदल करणे जितके गरजेचे आहे तितकेच स्वतःमधील संवेदनशील माणूस जपून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये संवादाचे पूल तयार करण्यासाठी तळमळीने व निष्ठेने प्रयत्न होणे गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या.

यावेळी प्रास्ताविक’ करताना यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी भावी पिढी घडवण्यात शिक्षकांचे योगदान किती मोलाचे असते यावर भाष्य केले.

याप्रसंगी यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सचे संचालक राजेश नागरे, संजय छत्रे यांच्यासह संस्थेतील सर्व अध्यापक व प्रशिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन पवन शर्मा यांनी केले.