हा प्रश्न केवळ आणि केवळ आरोग्याचाच…

हा प्रश्न केवळ आणि केवळ आरोग्याचाच...

जयंत जाधव

फटाके फोडणे म्हणजे विध्वंसातून आनंद घेणे. एखादी वस्तू जळाल्याने, त्यातून धूर आल्याने किंवा त्यातून मोठा आवाज आल्याने ज्यांना आनंद मिळतो त्यांची वृत्ती ही विध्वंसक असते किंवा विध्वंसक बनत चाललेली असते. लहान मुलांना आपण फटाके फोडायला शिकवून कोणते संस्कार करतोय हे ही लक्षात घेणे गरजेचे आहे. माननीय राष्ट्रीय हरित न्यायालयाने व यापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे निकाल देताना जी निरीक्षणे, आरोग्य सर्वे व तज्ञ मते नोंदवली आहेत ती गंभीर आहेत. वास्तविक कोरोनाच्या पर्शवभूमीवर हा निर्णय न्यायालयाने दिला आहे. आपल्या सांगली सारख्या शहराचा देशातील अति प्रदूषित १२२ शहरांमध्ये समावेश होणे ही बाब अतिशय गंभीर आहे. आणि नोंदविलेल्या निरीक्षणांमध्ये दिवाळीत सर्वात जास्त प्रदूषणाची नोंद आहे. त्यानंतर ख्रिसमस, ३१ डिसेंबर व इतर सण, कार्यक्रमांचा उल्लेख आहे.

मुळात दिवाळी हा सण प्रेमाचे, शांततेचे प्रतिक आहे. या सणात फटाके सोडून इतर हजारो आनंद घेण्याचे मार्ग आहेत. त्यामुळे या बंदीला काही लोक हिंदू-मुस्लिम किंवा अन्य असे धार्मिक स्वरूप देत असतील तर त्यांनी फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण, आरोग्यावर होणारे परिणाम, श्वसनाचे विकार, वयस्कर व्यक्तींना होणारे त्रास, लहान मुले किंवा प्राणी-पक्षांचे होणारे हाल हे धर्म पाहून होत नाहीत हे लक्षात घेणे गरजेचे आहे. म्हणून हा प्रश्न केवळ आणि केवळ आरोग्याचाच आहे हे मान्यच करावे लागेल.

कोरोना या महाभयंकर रोगामध्ये रुग्णसेवा करत असताना आम्ही, रुग्णांना श्वसनाचे होणारे त्रास आणि ऑक्सिजन विना होणारी तडफड डोळ्याने पहिली आहे. खूप सारी माणसे डोळ्यादेखत मरताना पहिली आहेत. कसेबसे हा रोग आटोक्यात आल्याचं चित्र समोर येत असताना, लॉकडाऊनमुळे हवेतील असणारे प्रदूषण गतवर्षी पेक्षा कमी आलेले असताना पुन्हा आपण प्रदूषणास व पर्यायाने या रोगांना कारणीभूत ठरत असू तर हे सर्वात वाईट ठरेल.

त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, न्यायालयाच्या निकालाची व प्रशासनाच्या अंमलबजावणीची वाट न पाहता या प्रदूषणकारी फटाक्यांपासून दूर राहूया.