सालगड्याच्या पोराला नेस्तनाबूत करण्यासाठी राष्ट्रवादीने काय काय केले?

सालगड्याच्या पोराला नेस्तनाबूत करण्यासाठी राष्ट्रवादीने काय काय केले?

रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क

अहमदनगर : कर्जत नगरपंचायतीसाठी (Karjat Nagar Panchayat) दोन दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) तर दुसरीकडे भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) असा थेट सामना रंगला होता. कर्जत नगरपंचायतीवर भाजपची एक हाती सत्ता होती. ही सत्ता राखण्यासाठी शिंदेंनी सर्व शक्ती पणाला लावली. मात्र, रोहित पवार यांनी भाजपचा गड भेदण्यासाठी जोरदार रणनिती आणल्याने कर्जत नगरपंचायत भाजपच्या हातून निसटली. भाजपला अवघ्या दोनच जागा जिंकता आल्या, तर राष्ट्रवादीने १२ जागांवर विजय प्राप्त करत एकहाती सत्ता मिळली. हा पराभव भाजपच्या खुपच जिव्हारी लागला असून जिल्हा परिषद कोरेगाव गटाचे पप्पू धोदाड यांनी एक भावनिक पोस्ट प्रसारीत केली आहे.

पप्पू धोदाड यांनी म्हटले आहे की, कुठ तरी एका वृतपत्रात वाचणात आलं की नगरपंचायत निवडणुकीत “राम शिंदे यांचा दारुण पराभव” आणि मनात विचार आला पक्ष, निवडणुका, समाजकारण, राजकारण हे सगळ एका बाजूला ठेवलं तर त्यापलिकडे माणुसकी आणि माणूस असतो. शेवटी जाणीव ही असायलाच हवी. ती नसेल तर मग… कशालाच काही अर्थ उरत नाही.

आपल्या कार्यकर्तृत्वाची यशस्विता ‘संशयास्पद’ वाटल्याने विद्यमान लोकप्रतिनिधींना भारतीय जनता पार्टीच्या दहा नगरसेवकांसह दोन नगराध्यक्ष, दोन उपनगराध्यक्ष, एक चाणक्य, एक गाडी नाणी, दहशतीसाठी दमबाज वाणी, चोवीस तास घरोघरी जाऊन हातमिळवणी शक्य तिथे गोड शब्दात विनवणी, ऐवढा सगळा ‘आब’ आणि ‘बाज’ हा फक्त एका सालगड्याच्या मुलाला नेस्तनाबूत करण्यासाठी वापरावा लागला. आणि तरीही हा ‘योध्दा’ यांचा सर्वांचा कसा घाम काढतो हे सर्वज्ञात आहे, कुणी कुणाचे भविष्य घडवत नसतो. ज्याच्या त्याच्या रक्तात कर्तृत्व नावाचे गुण असतात, अशी माणसे आपणहून उभी राहतात. त्यांना कसल्याच आधाराची गरज नाही, हा इतिहास आहे.

धोदाड पुढे म्हणतात की, खरं तर एका साखर सम्राटाच्या विरुद्ध एक भाकर सम्राट कसा लढतो. हे या लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभाने विश्लेषण करणे अपेक्षित होते पण ते तस का दिसले नाही ? हा सर्व सामान्य माणसाला प्रश्न पडतो. कर्जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रा. राम शिंदे यांनी दिलेल्या योगदानाबद्दल भविष्यात ही कोणी स्पर्धा करू शकत नाही. नगरपंचायत निवडणूकीत उमेदवाऱ्यांच्या वाणवे पासून एकतर्फी वाटणाऱ्या निवडणूकीत चुरस निर्माण करणे इतर कोणालाही अशक्य होते. पण राजकारणातील अंगभूत नेतृत्व गुणांबरोबर राजकारण समाजकारण करण्यासाठी जे व्यापक समजुतीचे चाणाक्षपण लागते ते राम शिंदे यांच्या रक्तात ठासून भरलेले आहे हे त्यांनी सिद्ध केले.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर सगळे जवळचे सहकारी सत्तेच्या तुकड्या पाहून सोडून गेले. तरीही न डगमगता एक हाती अतिशय कौतुकास्पद लढा दिला. सोबतीला होते फक्त चार दोन सहकारी, ना पैसा, ना दहशत, तरीही एकुण मताच्या टक्केवारी चा हिशोब करता या विचारधारेला 38/लोकांनी स्विकारल्याचे लक्षात येते. शेवटी ‘जो जिता वही सिकंदर’ हे जरी खरं असलं तरी प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. नियती कोणालाही माफ करत नाही. ती आपल्या पद्धतीने मोजमाप ठरवत असते. सत्ता, पैसा येतो आणि जातो तो दिर्घकाळ सोबत करेल याची कोणतीही शाश्वती नाही त्यामुळे उन्माद आणि उन्मत्तपणा न करता राजकारणापलिकडे एक ‘माणूस’ रहातो हेच लक्षात घेण्याची गरज असते.