काळेवाडी : भारतीय राज्यघटनेने प्रत्येक भारतीयाला मतदान करण्याचा सर्वोच्च अधिकार दिला आहे. मात्र, हा अधिकार तेव्हाच बजावू शकतो. जेव्हा प्रत्येक १८ वर्षांवरील तरूण-तरूणींची निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेली असेल. सरकारी अनास्थेमुळे अनेक भारतीय आपल्या या सर्वोच्च अधिकारापासून वंचित आहेत. कारण, त्यांची मतदार नोंदणीच झालेली नाही. अशा नोंदणी न झालेल्या व नवमतदारांच्या नोंदणीसाठी सामाजिक कार्यकर्ते व विद्यादीप शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अक्षय गंगाराम माने यांनी प्रयत्न करून सुमारे ११०० जणांना मतदान कार्ड वाटप केले आहे.
डॉ. माने यांच्या वतीने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असून नुकतेच त्यांनी आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर आयोजित केले होते. त्याचा काळेवाडी प्रभाग क्रमांक २२ मधील बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला, तर बेरोजगारांसाटी राबविलेल्या रोजगार मेळाव्यात १८०० तरूण-तरूणींची सहभाग घेतला. त्यामद्ये १०१ जणांना थेट नोकरी मिळाली.
या बाबात बोलताना डॉ. अक्षय माने म्हणाले की, स्थानिक स्तरापासून देश पातळीपर्यंत आपल्याला सेवा, सुविधा व राज्याची, देशाची धोरणे ठरविण्यासाठी आपण सेवकाची किंवा लोकप्रतिनिधीची निवड करत असतो. ही पद्धत मतदानाच्या माध्यमातून केली जाते. त्यासाठी तुम्ही फक्त भारतीय असून चालत नाही. त्यासाठी तुमची नोंदणी निवडणूक आयोगाकडे होणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने काळेवाडीतील नागरिक मतदानापासून वंचित राहू नये. यासाठी मतदान नोंदणीसाठी प्रयत्न केले.
डॉ. माने पुढे म्हणाले की, मी नवमतदारांना व पुर्वीपासून मतदानाचा हक्क बजावणाऱ्या सुज्ञ नागरिकांना आवाहन करतो, आपल्याला मिळालेला हा मतदानाचा हक्क पैशात किंवा लोभात विकू नका. कारण, हा हक्कच तुमचे भविष्य ठरवणार आहे. महापालिका, राज्य किंवा देश आपण चालवत आहोत. आपण दिलेल्या कर रूपी पैशानेच सर्वत्र विकास व आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी, मंत्री तसेच आपल्या सेवेसाठी ठेवलेल्या सरकारी कर्मचारी, अधिकारी यांना पगार दिला जातो.