जेट जगदीश
‘प्रदूषण नियंत्रण मंडळाविरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन’ 23 ऑगस्टच्या लोकसत्तेतील या बातमीत, ‘पाच वेळा मशिदीच्या भोंग्यांद्वारे होणाऱ्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष केले जाते आणि केवळ हिंदूंच्या सणाच्या वेळी प्रदूषण होते असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला वाटते. त्यामुळे ते फक्त हिंदूंच्या विरोधात पक्षपाती कारवाई करतात. म्हणून त्यांनी हिंदूंवर 230 खटले आणि मुसलमानांवर 22 खटले भरले. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करा.’ असा आरोप केल्याचे वाचले.
पण भारतातील लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार खटल्यांचे प्रमाण अगदी योग्य आहे. कारण महाराष्ट्रात काय की भारतात काय हिंदूंची संख्या सुमारे 80 टक्के आणि मुसलमानांची संख्या 14 टक्के आहे. खटल्यांचे प्रमाणही जवळपास तेवढेच भरते. याचा अर्थ प्रदूषण मंडळाचे लोक कुठल्याही प्रकारे पक्षपात करत नाहीत, हेच सिद्ध होत नाही काय?
तसेच DJ कधीतरीच वाजतो हा मात्र हिंदुत्ववाद्यांचा गोड गैरसमज आहे. कारण हिंदूंची लग्ने, हळदीचे कार्यक्रम, वेळोवेळी वर्षंभर केव्हाही होणाऱ्या सत्यानारायणाच्या पूजा, दहीहंडी, गणपती, नवरात्र, दिवाळी, होळी, बाबरी मशीद विध्वंस दिवस 6 डिसेंबर, 25 व 31 डिसेंबर, 14 एप्रिल, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी असे 12 महिने तिन्ही त्रिकाळ DJ दिवसभर वाजतच असतात, तेही ढणाणा कोकलत! माझा धर्म-तुझा धर्म करून हिंदुत्ववादी संघटना सामान्यांना त्रास देणारी ही कोणत्या प्रकारची देवभक्ती करत असतात?
या पार्श्वभूमीवर नि:पक्षपातीपणाने विचार केला तर असे लक्षात येते की, मशिवरील भोंगे दररोज दिवसातून पाच वेळा प्रत्येकी सुमारे 3 मिनिटे वाजत असतात. म्हणजे दिवसातून एकूण 15 मिनिटेच वाजत असतात. त्यासाठीही मशिदीच्या भोग्यांनाही आवाजाची मर्यादा आहे आणि जर ते पाळत नसतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
याचा अर्थ मी मशिदीवरील भोंग्यांचे समर्थन करतो असे नाही. ही फक्त तुलना आहे. खरे तर कुराण काळात लाऊडस्पीकरचा शोध लागला नव्हता म्हणून भोंग्यांचा उल्लेख कुराणात नाही. म्हणजे मुस्लिमांनी खरं तर लाऊडस्पीकर मशिदीवर लावताच कामा नये. जर मुस्लिम खरेच अल्लाभक्त असतील तर त्यांना त्यांच्या नमाजाच्या वेळा माहित असल्याच पाहिजेत. त्यासाठी भोंग्यातून सूचना द्यायची गरज पडू नये. या गरजेतून त्यांनी हवे तर मोबाईल ॲप तयार करायला हरकत नाही. म्हणजे प्रत्येक मुसलमानाला भोंग्याच्या ऐवजी मोबाईलमधून नमाजाची बदलणारी वेळ कळत जाईल. कारण कोणताच देव लोकांना त्रास देऊन मला भजा, माझा उत्सव साजरा करा म्हणून सांगत नाही.
ध्वनिप्रदूषणामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य या दोघांवर परिणाम होतो. ध्वनिप्रदूषणामुळे शारीरिक व मानसिक ताण वाढतो, मनुष्य चिडचिडा आणि आक्रमक होतो. त्याला झोप लागत नाही म्हणून त्याचे मानसिक संतुलन बिघडते व माणूस वेडापिसा होतो. ध्वनिप्रदूषणामुळे रक्तदाब वाढतो व हृदयरोगाला आमंत्रण मिळते. अनेकांना बहिरेपणा येतो. हृदयरोग असलेली व्यक्ती मोठमोठ्या ध्वनिवर्धकाच्या आवाजाने दगावण्याची शक्यता असते. गर्भवती स्त्रीच्या गर्भालाही ध्वनिप्रदूषणामुळे हानी पोहचू शकते. भविष्यात तुम्हीही त्याचे बळी होऊ शकता याचा कधी विचार केला आहे काय? सणासुदीमध्ये स्पिकरच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते, म्हणून ते टाळणेच श्रेयस्कर नव्हे काय?
एवंच हिंदुत्ववादी संघटना कधीतरी धर्मांधतेच्या आणि मुस्लिमद्वेषाच्या पलीकडे जाऊन विवेकाने विचार करतील काय?