
“नक्कल करु नका, तर ओरिजिनल राहा”
मुंबई (लोकमराठी) : सध्या इंटरनेट सेंसेशन बनलेल्या रानू मंडल यांची चर्चा आहे. लतादीदींचं गाणं गाणाऱ्या रानू यांना खुद्द लतादीदींनी सल्ला दिला आणि त्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. मंडल यांना सल्ला देताना लतादीदी म्हणाल्या की, “नक्कल करु नका, तर ओरिजिनल राहा आणि स्वत:ची शैली तयार करा”.
लतादीदींच्या या सल्ल्यानंतर सोशल मीडियावर उलट-सुलट प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. लतादीदींनी दिलेल्या सल्ल्यावर अनेकजण नाराज झाले असून त्यांच्या विधानावर नेटकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.
नेटकऱ्यांनी लतादीदींना ट्रोल करत अनेक ट्विट केले. एवढचं नव्हे, तर लता मंगेशकर यांना रानू मंडल यांच्याविषयी द्वेष आहे. रानू मंडल यांनी याविषयी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मात्र, त्यांच्यावतीने ट्रोलर स्वत:चं मतप्रदर्शन करत आहेत.
एका महिलेने लतादीदींना ट्रोल करताना लिहिलं की, ”मी लता मंगेशकर यांची खूप मोठी चाहती आहे, पण त्यांच्या प्रतिक्रियेने हे लक्षात येते की, मोठी लोकं सामान्य लोकांशी कशाप्रकारे व्यवहार करतात.”
तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं की, “एक गरीब महिला पोटापाण्यासाठी रेल्वे स्थानकावर गात होती. रानू मंडल यांच्या आवाजाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि त्या सुपरस्टार झाल्या. लताजींनी थोडा दयाळूपणा दाखवायला हवा होता. त्यांना मदतीचा हात पुढे करायला हवा होता. नकलेविषयीचं त्यांचं विधान टाळण्यासारखं आहे.”
काही नेटकऱ्यांनी लतादीदींच्या विधानावर संमिश्र प्रतिक्रिया नोंदविली आहे. तुम्ही गानसम्राज्ञी आहात. मात्र, रानू मंडलसारख्या नवख्या गायक-गायिकांना तुम्ही प्रोत्साहनही देऊ शकला असता, अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
तर काही नेटकऱ्यांचं असंही म्हणनं आहे की, लतादीदींनी संगीतकारांवर दबाव आणल्यामुळे वाणी जयराम, हेमलता, सुलक्षणा पंडित, सुमन कल्याणपूर, कविता कृष्णमूर्ती, अनुराधा पौडवाल या तत्कालीन गायिका त्यांची योग्यता असूनही लोकप्रिय होऊ शकल्या नाहीत.