पुणे (लोक मराठी) : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुण्यात महागणादिशांची दर्शन यात्रा काढणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोथरूडमधील भाजपचे इच्छुक मुरलीधर मोहोळ आणि कसब्याचे दावेदार धीरज घाटे यांच्या मंडळांच्या “श्रीं’च्या दर्शनाला जाणार आहेत. यानिमित्ताने मोहोळ आणि घाटे समर्थकांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासह शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आगामी निवडणुकीत आमदारकी मिळविण्याच्या मोहोळ आणि घाटे यांच्या इच्छेला मुख्यमंत्री पावणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, कसब्यातील दुसरे इच्छुक हेमंत रासने हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या उत्सवाचे प्रमुख आहेत. कसब्यातून तिसऱ्या इच्छुक असणाऱ्या महापौर मुक्ता टिळक आहेत. मुख्यमंत्री केसरीवाड्यातील मानाचा पाचवा गणपती उत्सवालाही भेट देणार आहेत. म्हणून कसब्यातील कोणत्या इच्छुकाला मुख्यमंत्री पावणार अशा चर्चांना उधाण आले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काढलेल्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा आटोपल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे पुण्यातील मानाच्या पाच गणपतींसह नवसाला पावणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ, श्री साने गुरुजी तरुण मंडळ आणि कोथरुडमधील श्री साई मित्र मंडळांच्या “श्रींची आरती मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.6) होणार आहे. सायंकाळी पाच ते पावणेसात या वेळेत मुख्यमंत्री मंडळांना भेटी देतील.
साई मित्र मंडळाच्या माध्यमातूनच मोहोळ हे पुण्याच्या राजकारणात आले. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून मोहोळ यांनी कोथरुडमधून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. तर, घाटे हे कसबा मतदारसंघातील श्री साने गुरुजी मित्र मंडळाचे नेतृत्व करतात. महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत निवडून आल्यापासून घाटे यांना कसब्याचे वेध लागले आहेत. या मतदारसंघात अर्धाडझन इच्छुक असतानाही घाटे तिकिटाबाबत बिनदास्त असल्याचे बोलले जात आहे.
मोहोळ आणि घाटे यांच्या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्री फडणवीस शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या मंडळांना भेटी देणार आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील अन्य इच्छुक बुचकळ्यात पडले आहेत; तर मोहोळ आणि घाटे समर्थकांत उत्साह आहे.
दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मार्चेबांधणी केली असून, विशेषत: सत्तेचे सिंहासन पुन्हा राखण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष जोरदार प्रयत्न करीत आहे. त्यात मुख्यमंत्री फडणवीस हे आघाडीवर आहेत. त्याचाच भाग म्हणून फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विविध भागांत महाजनादेश यात्रा काढण्यात आली. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री पुण्यात बाप्पाच्या दर्शनासाठी येत आहेत. मानाच्या गणपतीच्या दर्शनाला मुख्यमंत्री दरवर्षी येतात. मात्र, काही मंडळांना ते पहिल्यांदाच भेटी देणार आहेत. यानिमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस हे आगामी निवडणुकीच्या प्रचाराचा “श्रीगणेशा’ करणार असल्याचे बोलले जात आहे.