पुणे (लोकमराठी) : पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. आज आणखी १५ कोरोनाग्रस्त रूग्णांची त्यात भर पडली आहे. या १५ पैकी ११ जणांवर नायडू रूग्णालयात तर चार जणांवर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आज १५ रुग्णांची भर पडल्यामुळे पुणे शहरातील रूग्णांची संख्या १९० झाली आहे तर जिल्ह्यातील रूग्णांची संख्या २२५ झाल्याची माहीती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
दरम्यान, राज्यात करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. सध्या राज्यात १,३८० जण करोनाग्रस्त असल्याचं सांगण्यात येत आहे. यापैकी ११७ जण करोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे.
दरम्यान पुणे शहरातील मंडईत भाजी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्यामुळे आणि भाजी खरेदी दरम्यान सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) पाळले जात नसल्याचे सातत्याने पुढे आल्यामुळे आता दिवसातून के वळ पाच तासच भाजी विक्री करण्यास मुभा देण्यात आली आहे. भाजी मंडई आणि बाजार परिसरामध्ये एका वेळी फक्त पाच व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी त्याबाबतचे आदेश काढले असून या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सूचना महापालिके चे संबंधित अधिकारी, पोलीस आणि शासकीय यंत्रणांना दिले आहेत.