औरंगाबाद (लोकमराठी) : मागील पाच वर्षांत औरंगाबाद शहरात तब्बल 215 खुन झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या वर्षी सप्टेंबर महिन्यात आठ खून झाले असून, यातले बहुतांश खून मद्यपानामुळे झाले आहेत. अशा घटनांमुळे शहरात भितीचे वातावरण परले आहे.
शहरात गाजलेले मानसी देशपांडे, श्रुती कुलकर्णी खून प्रकरण असो की, अलीकडे सातारा परिसर, उल्कानगरीत झालेला हायप्रोफाईल खून अथवा सप्टेंबर महिन्यात चौधरी कॉलनीत झालेले तिहेरी हत्याकांड या व अशा कित्येक घटनांनी औरंगाबादकरांच्या मनात भय उत्पन्न होत आहे. शहरात खुनाच्या घटनांत सातत्याने वाढ होत असून, ही बाब चिंताजनक आहे. जानेवारी ते एप्रिल 2019 या चार महिन्यांत बारा खून झाले. ही सरासरी असतानाच सप्टेबर महिन्यातच तब्बल आठ खून झाले.
वर्चस्ववाद, गुंडगिरी, कौटुंबिक वाद, अनैतिक संबंध, आर्थिक व्यवहार, प्रेमप्रकरण, जमीन व्यवहार आदी कारणांमुळे खून होत असल्याची आतापर्यंत उदाहरणे आहेत. खुनांची संख्या घटविण्याचे कसब पोलिसांत आहे. प्रशिक्षणावेळीही त्यांना खून, त्यासंबंधीची कारणे आणि उपाययोजनांबाबत प्रशिक्षण दिले जाते. त्याचा वापर करून प्रतिबंध, प्रतिसाद आणि कारवाई या कृतीतून खुनाचा आलेख ते कमी करू शकतात. अनैतिक संबंध व गृहक्लेशामुळे होणारे खून सोडल्यास नशापानामुळे होणाऱ्या खुनावर तर नक्कीच आळा बसवता येऊ शकतो.
समाजात घडणाऱ्या विकृत घटनांवर केवळ पोलिसच नव्हे, तर समाज व कुटुंबासोबत सरकारचीही आळा घालण्याची जबाबदारी आहे. मुलांची जडणघडण, मूल्यशिक्षण, दर्जेदार शिक्षणासोबतच रोजगार, जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न अधिक सक्षमपणे करण्याची गरज पालक, शिक्षक व शासनाचीही आहे. परिणामी विकृती कमी होऊ शकते.
याबाबत निवृत्त पोलिस उपअधीक्षक दिगंबर गाडेकर म्हणाले की, इंडियन पिनल कोडमध्ये खुनाचा गुन्हा सर्वांत गंभीर समजला जातो. तीन डब्ल्यू अर्थात वाईन (दारू), वुमन (महिला), वेल्थ (संपत्ती) या गुन्ह्याला मुख्यत्वेकरून कारणीभूत आहेत. कोणताही खून झाल्यानंतर ही तीन कारणे तपासासाठी उपयुक्त ठरतात. या तीन कारणांबाबत वेळीच प्रतिबंध घातला, व्यवस्थित लक्ष दिले व त्यासंबंधी तक्रारीची तत्काळ दखल घेतल्यास संभाव्य गुन्हा टळू शकतो. महिलांची छेडछाड व इतर कारणांवर कारवाई केल्यासही खुनाचे गुन्हे टळू शकतात.
आकडे काय संगतात
वर्ष खून
2014 35
2015 35
2016 41
2017 32
2018 36
2019 36
एकूण 215