पुणे (लोकमराठी) : लॉकडाउनमध्ये सिगारेटचा पुरवठा कऱणाऱ्या डीलरविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी धाड टाकत ३९ लाखांच्या सिगारेट जप्त केल्या आहेत. पुण्याचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला सिगारेटचा एक डीलर शहरात सिगारेट तसंच इतर गोष्टी ज्यांचा जीवनाश्यक वस्तूंमध्ये समावेश होत नाही यांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती.
यानंतर तात्काळ कारवाई करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेशकुमार महाडीक यांनी एका व्यक्तीला ग्राहक म्हणून त्याच्याकडे पाठवलं. यावेळी डीलरने सिगारेटचा बॉक्स देण्याची तयारी दर्शवली. यासाठी त्याने दुप्पट किंमत मागितली.
लॉकडाउन सुरु असल्याने सिगारेट विक्रीवरही बंदी आली आहे. यामुळे सिगारेटचा एक बॉक्स दुप्पट किंमतीत म्हणजेच पाच हजार रुपयांना विकला जात आहे. बनावट ग्राहकाने डीलर शशिकांत याच्याकडून सिगारेटचा एक बॉक्स विकत घेतला. यानंतर पुणे पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत कोरेगाव पार्क येथे धाड टाकली आणि सिगारेटचे ३७ बॉक्स जप्त केले. पोलिसांनी ३९ लाखांची सिगारेट जप्त केली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डीलरला अटक करण्यात आलेली नसून लॉकडाउन संपल्यानंतर पोलिसांसमोर हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. दरम्यान पोलीस सध्या सिगारेटची खरेदी करणाऱ्या दुकानदारांची माहिती घेतली असून कारवाईला सुरुवात केली आहे.