पुणे : औंध यथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला. “शिक्षक दिन भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन यांनी १९०८ ते १९४९ पर्यंत शिक्षक म्हणून काम केले. शिक्षणाने विद्यार्थ्यांच्या मनात परिवर्तन घडते. विचार करण्याची क्षमता शिक्षणाने निर्माण होते. शिक्षक हा शिल्पकार असतो. शिल्पकार या शब्दात त्याचे महत्त्व अधोरेखित होते. भाषेचे महत्त्व सांगताना नॉलेज ऑफ लॅग्वेज व यूज ऑफ लॅग्वेज असे त्यांनी सांगितले. शिक्षण विषयक तत्त्वज्ञान डॉ. राधाकृष्णन यांनी सांगितले.” सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील, माजी हिंदी विभाग प्रमुख, प्रा. डॉ. गजानन चव्हाण यांनी आपल्या मनोगतात वरील उद्गार काढले.
पुढे ते म्हणाले की, भाषेचे महत्त्व सांगताना नॉलेज ऑफ लॅग्वेज व यूज ऑफ लॅग्वेज असे शिक्षण विषयक तत्त्वज्ञान डॉ. राधाकृष्णन यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी महापौर पुणे महानगर पालिका, पुणे व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य दत्तात्रय गायकवाड हे होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात मा.दत्तात्रय गायकवाड म्हणाले, “आजच्या दिवसाचे महत्त्व आगळे वेगळे आहे.शिक्षक दिनादिवशी एक दिवस शिक्षकांना आदर न दाखवता वर्षभर त्यांना आदर द्या. शिक्षक खूप मोठी जबाबदारी पार पडत असतात. जसा नदीचा प्रवाह अखंड चालू असतो तसे शिक्षकाचे कार्य अखंडपणे चालू असते. कारण शिक्षण कधी थांबत नाही. संपत नाही ते अव्याहतपणे चालू असते.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व परिचय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांनी केले. यानिमित्ताने महाविद्यालयातील सर्व सेवकांचा सत्कार गुलाब पुष्प व पेन देऊन करण्यात आला.कार्यक्रमाचे आभार मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य डॉ. रमेश रणदिवे, डॉ. सविता पाटील व महाविद्यालयातील सर्व सेवक व विद्यार्थी उपस्थित होते. तर सूत्रसंचालन प्रा. सायली गोसावी यांनी केले.