हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेजमध्ये प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने ‘राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर श्री. दिलीप भुर्के यांच्या हस्ते सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीव संरक्षण व संवर्धन आणि वनखात्याचे कायदे या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.
समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर, श्रीगोंदा कॉलेजचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव मस्के म्हणाले की, निसर्गाचे संवर्धन केले तरच वन्यजीवांचे संरक्षण होईल. त्यासाठी समाजामध्ये प्रबोधनाची गरज आहे. प्राणी व वनस्पती यांचे संवर्धन झाले पाहिजे. प्राण्यांच्या व वनस्पतीच्या सुरक्षेसाठी अभियानाची गरज आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड साहेब म्हणाले की, भारतीय तरुणांनी जर ठरविले तर पर्यावरणाचे संरक्षण ते उत्तम पद्धतीने करू शकतात. अशा उपक्रमातून संस्कार घेऊन युवकांनी वन्यजीवांचे व पर्यावरणाचे संरक्षण करायला हवे. विद्यार्थ्यांनी ‘निसर्ग समजून घेवून पर्यावरणाचे रक्षण करावे. असे विचार व्यक्त केले. हा कार्यक्रम प्राणीशास्त्र विभागाने आयोजित केला होता.
यावेळी रांगोळी स्पर्धा, फोटोग्राफी, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर व वाद विवाद स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. अशोक पांढरबळे, डॉ. हेमलता कारकर, डॉ. सोपान ऐनार यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. संजय जडे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य डॉ. किशोर काकडे, डॉ. खुंटे एस. पी., डॉ. एम. एन. रास्ते, प्रा. के. बी. पठाडे, सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व कार्यालयीन सेवक उपस्थित होते.