पिंपरी, दि. 28 जून 2023 : पिंपळे सौदागर येथील वै. ह.भ.प पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचलित पी. के. इंटरनॅशनल स्कूल ॲण्ड जुनियर कॉलेज मध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे. हा वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. असा हा सुख सोहळा अनुभवण्यासाठी पी. के. इंटरनॅशनल स्कूल ॲण्ड जुनियर कॉलेज मधील विदयार्थ्यांनी विठ्ठल रुख्मिणी, वारकरी, संत तुकाराम महाराज तर काही विदयार्थ्यांनी नऊवारी साडी, धोतीकुर्ता अशी वेशभूषा करत हातात टाळ मृदूंग तसेच डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन “ज्ञानोबा माऊली,ज्ञानराज माऊली तुकाराम ” तसेच “ विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल ” असा नामघोष करत टाळ व मृदूंगाच्या गजरात रिंगण सोहळ्यात सहभागी होत वारीची अनुभूती घेतली. रिंगणात शाळेतील शिक्षक व विदयार्थ्यांनी फुगड्या घालत फेर धरला. मुलांनी विठ्ठलाच्या गाण्यावर लेझीम नृत्य सादर केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोमनाथ काटे व रोहन काटे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमासाठी शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे, प्राचार्या धनश्री सोनवणे यांच्या समवेत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.