शिक्षणाच्या जोडीने शहाणपणही यावं – डॉ. तारा भवाळकर

शिक्षणाच्या जोडीने शहाणपणही यावं – डॉ. तारा भवाळकर

‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार २०२४’ च्या मानकरी डॉ. तारा भवाळकर यांनी हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणातील महत्त्वाचा संकलित अंश…

1) सांगलीमध्ये काही डॉक्टर, काही निरनिराळ्या क्षेत्रामधील मंडळी एकत्र येऊन आम्ही एक मासिक पत्रिका चालवतो. त्याच्यामध्ये जुन्या काळातलं चांगलं काय आणि ते ‘सायंटिफिक’ कसंय. आपल्याला वैज्ञानिक वगैरे असं म्हटलं की कळणं अवघड होतं. पण ‘सायंटिफिक’ म्हटलं की, अभिजात मराठीत पटकन कळतं. तर ते ‘सायंटिफिक’ कसंय हे सांगण्याचा प्रयत्न एक सद्गृहस्थ करत होते लेखनातून. आणि त्यामध्ये त्यांनी उदाहरण दिलं होतं की, कुंकू लावणं हे कसं ‘सायंटिफिक’ आहे. आपण सुज्ञ आहात. मला काय म्हणायचंय ते आपल्या लक्षात येईल. कुंकू लावलं की… भ्रूमध्यामध्ये अमूक एक बिंदू कसा असतो आणि वैज्ञानिक दृष्टीने तो दाबबिंदू कसा असतो. त्यामुळे स्त्रियांचं मानसिक संतुलन वगैरे वगैरे कसं राहतं. माझं डोकं हे पहिल्यापासून तिरकं चालणारं आहे आणि त्यामुळे माझ्या मनामध्ये प्रश्न आला आणि मी त्या सद्गृहस्थांना त्या मासिकामध्ये लिहून विचारलं की, जर स्त्रियांचं मानसिक संतुलन नीट राहावं म्हणून कुंकवाची बिंदी वगैरे लावत असतील तिथे दाबबिंदूवर, तर सगळ्या पुरुषांचं मानसिक संतुलन बरोबर असतं का? आणि दुसरी गोष्ट जर स्त्रीचं मानसिक संतुलन नीट राहावं असं वाटत असेल तर मग विधवांचं काय? कारण त्यांना तर मानसिक संतुलनाची जास्त गरज आहे, सामाजिक आणि कौटुंबिकरित्या. तर अशा प्रकारचे जे काही युक्तिवाद केले जातात विज्ञानाच्या नावावर ते कसे असतात ते आपण समजू शकता. लोककलांनी बौद्धिक जागर करावा, ज्ञानाचा जागर करावा, अशी अपेक्षा असते. पण कधी कधी त्याच्यामध्ये अवैज्ञानिक गोष्टी वैज्ञानिक म्हणून घुसडल्या जातात. ज्याला ‘स्यूडो सायन्स’ असं म्हणतात. छद्म वा व्याज विज्ञान.

2) बऱ्याच वेळेला शिक्षित म्हणवणाऱ्या लोकांकडून… मी सुशिक्षित म्हणत नाही. मी मास्तर आहे. शब्द जपून वापरते. कारण सुशिक्षित म्हटलं की अपेक्षा अशी असते की त्यांच्यात शहाणपण असावं. आपला आणखी एक समज आहे की, बायकांना लिहिता-वाचता येत नव्हतं त्यावेळेला त्या सगळ्या महामूर्ख होत्या. आपल्या सगळ्या पुरुषांसुद्धा लिहिता वाचता केव्हा यायला लागलं? साहेब आल्यानंतर आपल्याकडे शाळा निघाल्या, सगळ्या पुरुषांसाठीसुद्धा. बायकांची तर गोष्टच वेगळी आहे आणि लिहिता वाचता आल्यानंतर माणूस शहाणा होतो असं नाही. साक्षर होतो. साक्षरता, शहाणपण आणि शिक्षण याच्यामध्ये फरक असतो. तो आपण समजून घ्या. साक्षर झाल्यानंतर माणसाने शहाणं व्हावं अशी अपेक्षा असते. होतोच असं नाही. याची आपण अनेक उदाहरणं आसपास पाहात असतो.

एक बारीकसं उदाहरण देते. आमची बहिणाबाई चौधरी म्हणाली होती, तिला लिहिता-वाचता येत नव्हतं. आमच्याकडची सगळी मंडळी म्हणतात, बघा त्या बायका अडाणी असूनसुद्धा… हे ‘अडाणी असूनसुद्धा’ म्हणणारे ‘महाअडाणी’ आहेत, असं माझं मत आहे. बहिणाबाई अनक्षर होत्या. अक्षर ओळख नव्हती. साहेब आमच्या देशात आल्यानंतर आमचा एक असा समज झालेला आहे की, लिहिता वाचता येणं म्हणजे शिक्षण. लिहिता-वाचता ज्या वेळेला माणसाला येत नव्हतं तेव्हा ती माणसं शेती करत नव्हती का? घरं बांधत नव्हती का? विहिरी खणत नव्हती का? घराचं वायुविजन राखत नव्हती का? वस्त्र विणत नव्हती का? स्वयंपाक करत नव्हती का? बाळंतपणं करत नव्हत्या का बाया? याला शिक्षण म्हणायचं की नाही? की फक्त लिहिता-वाचता येणं म्हणजे शिक्षण. मग माझी बहिणाबाई चौधरी म्हणते, ‘‘अरे, मानसापरी मानूस राहतो रे येडाजाना आनि छापीसनी होतो कोरा कागज शहाना.’’ छापल्यानंतर कोरा कागदसुद्धा शहाणा होतो, पण छापलेले अनेक कागद वाचल्यानंतर माणसासारखा माणूस येडा जाना राहातो. लिहिता वाचता आलं म्हणजे सर्व शिक्षण येतंच असं नाही, ते केव्हा येतं शहाणपण असलं त्याच्या जोडीला तर येतं. शिक्षणाने माणूस शहाणा व्हावा अशी अपेक्षा असते. होतोच असं नाही. असं ४५ वर्षं सर्व स्तरावर शिक्षण क्षेत्रात काम केल्यानंतर मी सांगते. म्हणजे अनुभवसंपन्न वगैरे काय म्हणतात ते सगळं. तर हे जे आपले अपसमज आहेत. त्या अपसमजातनं आपण नागर मंडळी जितक्या लवकर बाहेर येऊ तितकं बरं. आणि आम्हाला असं वाटत असतं आम्ही नगरी म्हणजे नागर, महानगरी मंडळी हे अतिजास्त सुबुद्ध आहोत, ते आहोत की नाही याचं जरा आत्मपरीक्षण करावं. एवढंच मी अत्यंत नम्रपणाने सांगू शकेन.

3) एकीकडे आम्ही आईला महन्मंगल, पवित्र वगैरे वगैरे वगैरे सगळं मानतो. आणि पहिली शिवी तोंडात येते ती आईवरून आणि बहिणीवरून. याच्यामधले जे विरोधाभास आहेत आमच्या जगण्यामधले. हे आमच्या कधी लक्षात येतात की नाही असा प्रश्न आहे. आई होणं हे जर महन्मंगल पवित्र असेल. तर मग आमचे बंधू, आमचे बाप असं कधी म्हणतात का? की, मला बाईच्या जन्माला घाल म्हणजे आई होता येईल चांगलं. मग माझी जात्यावर दळण दळणारी बाई जास्त शहाणी आहे हो. ‘देवा नारायणा माझी विनंती फार फार, जन्म बायकांचा नको घालूस वारंवार.’ जर बायकांचा जन्म एवढा पवित्र, उदात्त असता तर मला बायकांचा जन्म वारंवार घालू नको असं तिनं का म्हटलं असतं? आणि कुठल्याही पुरुषाने मग असे नवस का केले नसते मला बायकांचा जन्म घाल म्हणून. असले विरोधाभास आमच्या लक्षातच येत नाहीत पुष्कळदा की आमची कृती आणि उक्ती याच्यात फरक आहे. हे गौरवांकित करत असताना मोठी मोठी विशेषणं वापरायची आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये तिसरंच काही तरी होत असतं.

4) शिकारी अवस्थेतून अजून आपण बाहेर आलेलो नाही. फक्त शिकारीच्या पद्धती बदलल्या. याच्याबद्दल जास्त सांगायची गरज नाही. हिंदीमध्ये हजारीप्रसाद द्विवेदी हे एक मोठे सामाजिक अभ्यासक आणि ललित लेखकही होते. त्यांचा एक सुंदर वैचारिक निबंध आहे. त्याचं उदाहरण मी मोनिकाला दिलं होतं. ‘नाखून क्यू बढते है?’… ‘माणसाची नखं का वाढतात?’ हजारीप्रसादजींनी सांगितलं, ‘‘ये इस बात की निशानी है के आदमी में जानवर है। वो अब तक जिंदा है।’’ माणसामधला जनावर अजून जिवंत आहे, कारण जनावर अवस्थेमध्ये तो नखाने ओरबडून आणि दाताने ओरबडून शिकार खात असे. आता नखं वाढतायत आपली, तो शिल्लक राहिलेला शारीरिक अवशेष आहे, जैविक अवशेष. मानसिक अवशेषही वाढतोय की काय असा प्रश्न निर्माण होतो कधी कधी.

5) मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला ही चांगली गोष्ट आहे. समाधान आहे. कारण शासकीय पातळीवर कुठलं शिक्कामोर्तब होणं ही आनंदाची गोष्ट असते. तेवढा आनंद मलाही झाला. आपल्यालाही झाला. प्रश्न असा आहे ती मराठी भाषा टिकवण्यासाठी शिक्षण क्षेत्रात काम करत असलेली एक डोळस नागरिक म्हणून मी फक्त सांगते. मराठी भाषा शिक्षणामध्ये किती टिकते काय? मराठी शाळा किती बंद पडतायत? शिक्षकांना वेळेत अनुदान मिळतंय की नाही? पूर्ण वेळ शिक्षकांच्या नोकऱ्या मिळतायत की नाही? आपल्या मुलांना आपण मराठी माध्यमातून शिकवतो का? किती मंडळी पूर्णपणे घरामध्ये मराठी बोलतात? की पोरगं दुपट्यातनं बाहेर पडल्यापासनं तुला यलो कलर आवडतो का रेड कलर आवडतो? म्हणून विचारतात. लाल आणि पिवळा काही कळत नाही, तर अशा साध्या साध्या गोष्टी आहेत. मराठी टिकवायची असेल तर आपण मराठी किती वापरतो? कारण कुठलीही गोष्ट चलनात असते तोपर्यंत ती टिकत असते. चलनातनं गेलं की नाणं बाद होतं. ‘भाषा’ ही एक सजीव संस्था आहे. आणि ती सजीव संस्था जर सजीव राहायची असेल तर सजीवांनी तिचा जागरूकपणे वापर केला पाहिजे.
–प्रेषक: जगदीश काबरे