
लोकमराठी न्यूज नेटवर्क
काळेवाडी : काळेवाडीतील दुरवस्था झालेल्या विविध रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मागील अनेक दिवसांपासून पाठपुरावा होता, त्याला अखेर यश आले. ज्योतीबानगरमधील पंचनाथ कॉलनीच्या डांबरीकरणाचे काम सोमवारी (ता. 2) सुरू झाले. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पाणीपुरवठा वाहिनी, सांडपाणी वाहिनी तसेच खासगी टेलिफोन कंपन्यांची केबल टाण्यासाठी ज्योतीबानगर, राजवाडेनगर, कोकणेनगर, नढेनगर आदी परिसरातील रस्त्यांची खोदाई करण्यात आली. मात्र, त्यांची दुरूस्ती योग्य पद्धतीने न झाल्याने रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. काही रस्ते विविध कामांसाठी सतत खोदल्याने रस्त्यांवर खड्डे पडले असून खडी पसरली आहे. त्यामुळे अपघात नित्याचेच झाले आहेत. नागरिकांचे हाल लक्षात घेता खोदकाम झालेल्या रस्त्यांच्या डांबरीकरणाची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लावून धरली आहे.
दरम्यान, अखेर पंचनाथ कॉलनीच्या डांबरीकरणाचे काम सुरू केले असून इतरही रस्त्यांची कामे लवकरच केली जाणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने डांबरीकरणाचे लेखी आश्वासन देऊनही प्रशासन गंभीर नव्हते. त्यामुळे रस्ते दुरूस्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. त्याला प्रतिसाद देत लवकरच रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येईल असे महापालिका प्रशासनाने लेखी आश्वासन दिले. त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले. आणि आता डांबरीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे.
- अनिता पांचाळ, महिला उपशहराध्यक्षा, मनसे