अॅड. संजय माने
कोणत्याही व्यवसायिकांची संघटना ही संघटित झालेल्या सदस्यांच्या हितासाठी काम करत असते. नवीन काही करू इच्छिणाऱ्यास प्रोत्साहन दिले जाते. कधी एखाद्या सदस्याकडून चुकीचे कृत्य घडले तर त्याला वाचविण्यासाठी संघटना प्रयत्न करत असते. इतर सर्व संबंधिताला सावरण्याचा प्रयत्न करत असतात, पत्रकारितेत मात्र उलट दिसून येते. एखादा सहकारी काही वेगळे करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला अडचणी निर्माण केल्या जातात, अडचणीत असेल तर तो आणखी कसा अडचणीत येईल यासाठी प्रयत्न केले जात असल्याने पत्रकारच पत्रकारांच्या जीवावर उठल्याच्या घटना विविध ठिकाणी घडू लागल्या आहेत.
समाजातील चुकीच्या गोष्टींबद्दल आवाज उठविणारे पत्रकार आपलाच कोणी सहकारी चुकीचे काम करताना आढळून आल्यास त्यालाही सोडत नाहीत, अशा भूमिकेतून तसेच निष्पक्ष हेतूने काही होत असेल तर ही माध्यमांची प्रतिमा उंचावण्यास चांगलीच बाब आहे. पण अशा प्रकरणांमध्येही कोणाला तरी वाचवायचे कोणाला तरी टार्गेट करायचे अशी कपटी , स्वार्थी द्वेषबुद्धीची दुटप्पी भूमिका दिसून येते. हे निश्चितच समर्थनीय नाही.
कोरोना संसर्गाच्या कठीण काळात पत्रकारांना कटू अनुभव आले, कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या. कामगार कपातीच्या धोरणात अनेक पत्रकारांना बेरोजगार व्हावे लागले. अनेकजण कोरोना संसर्गित झाले. काहींना जीव गमवावा लागला. एवढे सर्व काही घडले, त्यावेळी कोणीही संकटग्रस्त पत्रकारांच्या मदतीला धावून आले नाही. या बिकट परिस्थितून सावरत असताना, पत्रकार नवं नव्या संकटात अडकू लागले आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. एवढेच नव्हे तर, एकमेकांना पत्रकार भिडू लागले आहेत. अशा घटना रोजच कुठे ना कुठे घडत आहेत. चुकीचे काम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत,पण असे चुकीचे काम करणारी मंडळी एक चुकीचे काम करत नाही. एका दिवसात असे काही अचानक घडत नाही. अशा कामासाठी विशिष्ट लोकांची टोळी तयार झालेली असते. आपले वेगळे संस्थान तयार झाले आहे, अशा अविर्भावात नेहमीच काम करणारे कधीना कधी संकटात सापडतातच. अशी कामे करत जगण्याची ज्यांना सवय झालेली असते. अशांना वेळीच रोखण्यासाठी, त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी कोणीही ब्र शब्द काढत नाही. घटना घडून गेल्यानंतर मात्र आपापसात कुरबुर सुरू असते. हाच प्रकार पत्रकारितेची विश्वासहर्ता धुळीला मिळविण्यास आणि पत्रकारांचे करिअर बरबाद करण्यास कारणीभूत ठरणार आहे. हे कोणत्याही ज्योतिषाने सांगण्याची गरज नाही.
पत्रकारांचे कोणीही शत्रू नाहीत, ते स्वतःच स्वतःचे शत्रू आहेत. आपल्याच एखाद्या सहकाऱ्याने वेगळ्या व्यवसायची वाट निवडली, तर त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे, याउलट त्याला अडचणी कशा निर्माण होतील. त्याला मिळालेले काम काढून तिऱ्हाईत व्यक्तीला देण्यासाठी खटाटोप करणारी काही पत्रकार मंडळी आहे. आपल्याच सहकारी बांधवांना अडचणीत आणण्याची वाईट प्रवृत्ती दिवसेंदिवस पत्रकारिता क्षेत्रात वाढत आहे. त्यामुळे पुढील काळ कठीण असून यापुढे गैरकृत्यांच्या घटनांच्या बातम्यांमध्ये पत्रकारच बातम्यांचे विषय झाले, तर नवल वाटण्यासारखे काही असणार नाही.