- शिवसेना विभाग संघटीका भाग्यश्री म्हस्के यांची पोलिसांकडे मागणी
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी परिसरात राहणाऱ्या सातपुते कुटुंबाने सुमारे १०० पेक्षा जास्त लोकांचे भिशीचे कोट्यावधी रुपये घेऊन पोबारा केला आहे. या फसवणुकीच्या प्रकाराबाबत वाकड पोलीस ठाण्यात अनेक तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी चिंचवड मतदार संघाच्या शिवसेना विभाग संघटीका व पोलीस मित्र संघटनेच्या शहर उपाध्यक्षा भाग्यश्री म्हस्के यांनी पोलिसांना निवेदन दिले असून लवकरात लवकर आरोपींचा शोध घेण्याची मागणी केली आहे.
गुंतवणूकदारांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी परिसरात राहणाऱ्या सातपुते कुटुंबाने नागरिकांनी विश्वासाने लावलेल्या भिशीचे पैसे स्वतःकडे ठेवले. त्या पैशांची स्वतः गुंतवणूक करून गुंतवलेले पैसे मिळत नसल्याचा बहाणा करून भिशी घेणारा व्यक्ती परशुराम सातपुते, त्याची पत्नी पुष्पा सातपुते, मुलगा सागर सातपुते आणि इतर कुटुंबीय कोट्यावधी रुपये घेऊन पसार झाले आहेत.
घडला प्रकार असा आहे कि, २७ जून २०२१ रोजी परशुराम सातपुते, पुष्पा सातपुते आणि त्यांचा मुलगा सागर सातपुते हे घर सोडून अचानक निघून गेले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या घरातील अन्य सदस्य देखील निघून गेले. दरम्यान सातपुते यांनी घर सोडताना एक चिठ्ठी सोडली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘आम्ही जमा केलेल्या काही रकमेची पुढे गुंतवणूक केली होती. गुंतवणूक केलेले पैसे मिळत नसल्याने आता भिशी लावलेल्या नागरिकांना द्यायला आमच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे आम्ही घर सोडून जात आहोत.
घडलेला प्रकार खूपच भयंकर असून गरीब गुंतवणूकदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी आरोपी सातपुते कुटुंबाला लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी केली आहे.