पूरपरिस्थिती सरकारी यंत्रणा आणि मदत मागणाऱ्या हजारो संस्था संघटना

पूरपरिस्थिती सरकारी यंत्रणा आणि मदत मागणाऱ्या हजारो संस्था संघटना

भीक नको पण कुत्रा आवर ह्या म्हणीप्रमाणे, कधी नव्हे ते आपत्कालीन परिस्थितीमध्ये पावसाळ्यात मोठ्या झाडाच्या पायथ्याशी जश्या पांढऱ्या छत्र्या उगवतात त्याच प्रमाणे मदत मागणारे उगवतात आणि ह्या छत्र्यांना (मदत मागणाऱ्यांना) कायम हे मोठं झाड (ज्या झाडाखाली ह्या उगवल्यात) ते झाड जणू आमच्यामुळेच उभं आहे की काय अश्या आविर्भावात ही सगळी मंडळी असतात.

अश्या हवश्या नवश्या आणि गवश्यानीच आजकालचा डिजिटल मीडिया व्यापून टाकलाय. ज्यांना स्वतःच 30 लोकांचं मित्र मंडळ सांभाळता येत नाही असे लोक राज्याच्या मदतकार्यात उतरलेत. ज्यांनी आजवर भाषणबाजी करत उपाशी लोकांचं पोकळ प्रबोधन केलंय असे खिशातला एक रुपया ही न मोडणारे भिक्कार सो कोल्ड डॉक्टर, प्राध्यापक, वकील आणि फलाना बिस्ताना लोक सुद्धा मदतकार्यात उतरलेत इतकंच काय तर CSR फंड आपल्याच खिशात जावा म्हणून मोठं मोठे कॉर्पोरेट पण यात शामिल झालेत.

चांगलं आहे बाबा पण हे उतरलेत कोणाच्या जीवावर? कोणाच्या भरवश्यावर ? तर याच उत्तर आहे फक्त आणि फक्त सामान्य जनता, मध्यमवर्गीय आणि थोड्याफार पैशावाल्यांच्या जीवावर.

मदतकार्यात काम करणे, त्यानिमित्ताने लोकांना मदत करणे, आपापसात निधी गोळा करून तो गरजू लोकांना देणे यात वाईट काहीच नाहीये, मुद्दा हा आहे की, या सगळ्यातल आपल्याला किती कळत? याचा आपल्याला किती अनुभव आहे? मदत घेणारा नेमका आपल्याला ओळखता येतो का?आपली मदतिची भावना भावनिक आहे की प्रॅक्टिकल? इतके सगळे source वापरून उभी केलेली मदत सहज कोणीतरी गाववाला आपल्याकडून घेतो आणि मी ती मदत सर्वांना वाटणार म्हणून नेतो असा अनुभव असलेले राज्यात हजारो लोक सापडतील.

मग आपण का हे करतोय ? आपला उद्देश असेलही निस्वार्थी, सामाजिक आणि तो राजकीय असला तरी हरकत काहीच नाहीये पुन्हा मुद्दा हा आहे की, आपण मदत गोळा करतोय पण ती मदत देत असताना अभ्यास न करताच हवेत किंवा अंधारात चाचपडत बसतोय हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

आज रायगड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात झालेली वाताहत आपल्याला भयानक वेदना देतेय खरंय आपल्याला अस्वस्थ व्हायला होतंय हे खरं आणि माणुसकी जिवंत असण्याचं लक्षण आहे त्यामुळे साहजिकच आपली पाऊले त्या दिशेने पडतायेत भारीच गोष्ट आहे परंतु, 100 लोक मेले असतील तर 1000 संघटनांनी तिथं जाऊन नेमकं काय करायचं ? याहून बेक्कार गोष्ट म्हणजे जे प्रसारमाध्यमे दाखवतात तितकच ह्यांना माहीत बाकी काहीही माहीत नाही म्हणूनच खालचा paragraph लिहिलाय की,

राज्यात आतापर्यंत झालेली मृत्यू आणि त्यातली ठिकाणे

महाड तालुक्यातील तळये गाव 36 मृत्यू, पोलादपूरातील सुतारवाडी 11 मृत्यू,

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी, मोजेझोर.

तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड तालुक्यातील मुख्यत्वे करून पोसरे गावातील बौध्दवाडा त्यातील 67 लोकसंख्या पैकी 18 घरे आणि मृतांची संख्या 17 आणि जखमी 7 (कालपर्यंतचा आकडा)

हे वरील सरकारी आकडे आहेत यात अजूनही मृत म्हणून सापडलेले नाहीत असे एकूण आकडे 150 ते 400 च्या घरात आहे.

आता मला एक गोष्ट कळत नाही आपल्याकडे मदत मागणाऱ्यांना हे वरच किती माहितीये की सगळेच लोक मिळून तळंये आणि पोसरे मध्ये जाणार आहेत ?

नुसती तळये आणि पोसरे ची लोकसंख्या धरली तरी आमची एक संस्था या दोन्ही गावाला रेशन पुरवण्यास आताही समर्थ आहे मग हा बाकीचा गवगवा आणि शो शायनिग का आणि कशासाठी सुरुये ?

याहून अधिक म्हणजे स्वतःच काहीही न लावता आईजी च्या जीवावर बाईजी उधार असलेल्या ह्यांना आपण का थारा देतोय आणि यात अजून भारी गोष्ट म्हणजे विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याची कमी होती म्हणून की काय सत्ताधारी सुद्धा लोकांकडून मदत मागण्यासाठी तयार आहेत ही तर हद झाली यार.

आणि म्हणूनच या अश्या सगळ्या पावसाळी छत्र्यांना लोकांनी बाजूला काढलं पाहिजे या सगळ्या डिजिटल लोकांमुळे ग्रासरूट ला काम करणाऱ्या खऱ्या संस्था संघटना आणि त्यांनी सर्वेक्षण करून अभ्यास करून निवडलेली गावे, पाडे, त्यांची इथंबूत माहिती ही बाजूला राहते आणि मीडिया लाईम लाईट मध्ये आलेल्या वाड्या वस्त्यांना नको असली तरी सगळी मदत एका ठिकाणी एकवटते.

आणि म्हणून आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून कोकणातल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील नेमकी झालेली परिस्थिती ही सरकारी यंत्रणा आणि स्थानिकांच्या (local stakeholders) यांच्या माध्यमातून जाणून घेऊन आपल्यापर्यंत स्वच्छ आणि आहे ती माहिती घेऊन येऊ आणि ती माहिती घेऊन आमच्याकडे आज तयार असलेल्या वस्तू धान्य याची नेमकी आकडेवारी सांगून अजून काय किती आणि कुठं लागेल हे लवकरच कळवू. मग मात्र आपण आपल्याला शक्य होईल ती मदत करावी ही अपेक्षा….

सरकारी यंत्रणा आणि कामगिरी

१. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी 10हजार अधिक किराणा साठी 15 हजार अशी वाचेलेल्या कुटुंबासाठी मदत जाहीर केलीये याची नोंद घ्यावी.

२.महाराष्ट्र सरकार मृतांच्या कुटुंबाला रुपये 5 लाख ही मदत जाहीर केलीये.

३. त्या त्या जिल्ह्याच्या कलेक्टर आणि पालकमंत्री यांनी जवळपास 2 लाख लोकांचं स्थलांतर करून त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था केली आहे साहजिकच त्यात सुद्धा त्रुटी असतीलच.

४. अतिशय महत्त्वाच म्हणजे जेंव्हा लोक पुन्हा त्यांच्या घरी जातील तेंव्हा त्याना घर नसेल, काहींना घर असेल तर भांडी कपडे नसतील काहींना काहीही नसेल या परिस्थितीत मला मागच्या वेळी पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुराची आठवण झाली सत्ताधारी ते विरोधक सगळ्यांनी मिळून काही गाव दत्तक घेतली होती म्हणे आज ती गाव उभी आहेत का याची सुद्धा माहिती या डिजिटल कार्यकर्त्यांनी घ्यावी याच अपेक्षेसह आपण या सगळ्यांचा विचार करून योग्य तो निर्णय घेऊनच या पुनर्वसनाच्या कामात माणसं आणि संस्था संघटना ओळखूनच मदत करावी ही विनंती.

महेंद्र अशोक पंडागळे

Inspire Foundation

ठाणे महाराष्ट्र

7678044677