चिंचवड : १६ ऑक्टोबर हा जागतिक भुलतंत्र दिवस. डॉ. विल्यम थॉमस ग्रीन मॉर्टन ह्या शास्त्रज्ञाने सोळा ऑक्टोबर १८४६ या दिवशी पहिली भूल दिली होती. हे औचित्य साधून जगभरात हा दिन जागतिक भूल तंत्र दिवस म्हणून साजरा केला जातो. पिंपरी चिंचवड भूलतज्ञ संघटनेच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात हा दिवस, बंद पडलेले हृदय चालू करण्याचे “जीवन संजीवनी” हे प्रात्यक्षिक दाखवून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा सहाय्यक आयुक्त श्रीकांत दिसले यांच्या हस्ते पार पडला. उपस्थित भूल तज्ज्ञांनी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांकडून कृत्रिम मानव देहावर प्रत्यक्षित करवून घेतले. सामान्य माणसांत भूल तज्ञांचे काम फक्त भूल देण्याचे असते, असा समज असतो. परंतु, भुलतज्ञांचे काम फक्त भूल देण्या पुरते मर्यादित नसून, ऑपरेशन दरम्यान नाडीचे ठोके कमी जास्त झाल्यास, रक्तदाब कमीजास्त कमीजास्त झाल्यास, अचानक रक्तस्त्राव होवून रक्तदाब कमी झाल्यास त्याचे नियंत्रण करणे, आयसीयु मधे कृत्रिम श्वासाचे नियोजन करणे, इतर वेदनांचे नियोजन करणे, इत्यादी अनेक गोष्टीत भूलतज्ज्ञ कुशल असतात.
विविध अंगी निपुण असलेल्या सर्व भूल तज्ञांना पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम प्रसंगी पिंपरी चिंचवड भूल तज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ. माया भालेराव, डॉ. स्मिता कुलकर्णी, डॉ. उमा देशमुख, डॉ. शुभांगी कोठारी, डॉ. सीमा सूर्यवंशी, डॉ. संदीप बाहेती, डॉ. छाया सूर्यवंशी, डॉ. शुभांगी तेकरुरकर, डॉ. खलकी कुमार, डॉ. सोनालिका तुडीमिला, डॉ. तवलीन बरार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.