लोकसभा जरी ३६ राज्यातील ५४४ सदस्यांनी बनत असली तरीही त्यातील १३ राज्येच संख्यात्मकतेने प्रभावी ठरतात. या १३ राज्यातच तब्बल ८१ % म्हणजे ४४० खासदार आहेत. सत्ता संपादनासाठी लागणारा २७२ हा जादुई आकडा देखील या १३ राज्यातील निम्म्या जागा जिंकल्या तरी गाठायला सोपा जातो. थोडक्यात, या १३ राज्यातून मागच्या वेळी भाजपला काय मिळाले व आता काय मिळणार ते पाहिले तर भाजपचा पराभव स्पष्ट होतो.
आधी राज्यवार एकूण जागा पाहू : (१) उत्तरप्रदेश ८० (२) महाराष्ट्र ४८ (३) बंगाल ४२ (४) बिहार ४० (५) तमिळनाडू ३९ (६) मध्यप्रदेश २९ (७) कर्नाटक २८ (८) गुजरात २६ (९) राजस्थान २५ (१०) आंध्र २५ (११) ओडिशा २१ (१२) केरळ २० (१३) तेलंगणा १७.
आता भाजपची या राज्यातील मागच्या वेळची कामगिरी पाहू : केरळ व तमिळनाडू या राज्यात भाजपला भोपळा फोडता आला नव्हता. बंगाल, आंध्रमध्ये प्रत्येकी दोन तर तेलंगणा व ओडिशात प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले होते. राहिलेल्या सात राज्यांपैकी कर्नाटक १५ व बिहार २२ अशी साधारणतः ५० टक्के जागांची बेगमी झाली होती. खरा हात दिला तो उ. प्रदेश (७१), म. प्रदेश (२६), गुजरात (२६), राजस्थान (२५) व महाराष्ट्र युतीत (४२) या पाच राज्यांनी. भाजपला या १३ राज्यांपैकी अकरा राज्यातच २२६ जागा मिळाल्या होत्या.
यावेळी उ. प्रदेशात अखिलेश – मायावतीची आघाडी आहे. म. प्रदेश, छत्तीसगड व राजस्थानात सत्ता गेली आहे. कर्नाटक व बिहारमध्येही भाजपच्या विरोधात जनमत आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेसचे उमेदवार पळवून आणावे लागत आहेत व गुजरातही विधानसभेत काठावर पास झाल्याने तेवढा हात देणार नाही.
सबब, या राज्यात भाजप शंभरच्या आतच राहील व उर्वरित २४ राज्यातील ८ राज्यात भाजपला मागच्याच वेळी भोपळा होता. राहिलेल्या १६ राज्यातील मिळून म्हणजे दिल्ली, चंडिगढ, अरुणाचल, आसाम, जम्मू, पंजाब, उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड, हरियाना, हिमाचल इत्यादी राज्यात भाजपने बरी म्हणावी अशी ५६ जागांची तोंडमिळवणी केली होती. म्हणजे ही नवी जुनी बेरीज सुद्धा भाजपला १५० जागांच्या पुढे सरकण्याचा दिलासा देत नाही.
मोदी शहांचे चेहरे त्यामुळे पडले आहेत. भाषा व मुद्देही घसरले आहेत. लोकांमध्ये भाजप विरोधाची सुप्त नव्हे तर प्रकट लहर आहे. मीडिया अद्यापही भाजपकडे पाणी भरत असला तरी भाजपचा पराभव अटळ आहे.
– किशोर मांदळे, पुणे.