पिंपरी : काळेवाडीतील शिवसेना कार्यकर्ते सुनिल तात्या पालकर यांनी नुकतीच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी पालकर यांनी काळेवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मुद्द्यांवर मंत्री शिंदे यांच्याबरोबर चर्चा केली. मंत्री शिंदे यांनी काळेवाडीतील विकासासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर याबाबत कार्यवाही करू असे आश्वासन दिले. तसेच पालकर यांना पुढील समाज कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महाड पोलादपूर माणगाव मतदार संघाचे आमदार भरतशेठ गोगावले, सामाजिक कार्यकर्ते दिपक तरडे, अविनाश उत्तेकर, दिनकर जाधव, निलेश मोरे, सुशील मिरगल उपस्थित होते.
काळेवाडी प्रभाग क्रमांक २२ मधील प्रमुख डीपी रस्ते व खेळाचे मैदान विकसित करणे, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौकात (एमएम चौक) महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारणीचे काम तातडीने मार्गी लावण्याची आग्रहाची मागणी सुनिल पालकर यांनी मंत्री शिंदे यांच्याकडे केली. यावर मंत्री महोदयांनी सकारात्मकता दाखवली. अशी माहिती पालकर यांनी लोकमराठी न्यूजशी बोलताना सांगितली.
पालकर म्हणाले की, काळेवाडीतील नागरिक वर्षानुवर्षे मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहेत. वाढती लोकसंख्या लक्षात घेता, महापालिकेकडून योग्य नागरी सुविधा पुरविल्या जाणे गरजेचे आहे. मात्र, महापालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे. आम्ही नागरिकांच्या हक्कांसाठी सदैव प्रयत्न करत करणार आहोत.