पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी महिला दिनालाच महिलांचा अपमान केला – बाबा कांबळे

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी महिला दिनालाच महिलांचा अपमान केला - बाबा कांबळे
  • विविध मागण्यांसाठी सफाई महिला कामगारांचे महापालिका समोर ठिय्या आंदोलन

पिंपरी, ता ८ : साफसफाई कंत्राटी कामगारांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये महिला कामगारांनी महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. 8 मार्च जागतिक महिला दिन जगभरामध्ये मोठ्या उत्साहात मध्ये साजरा केला जात आहे. मात्र पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील इतिहासात पहिल्यांदाच 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या एक दिवस अगोदर ७ मार्च पासून पिंपरी चिंचवड महानगरपालिका समोर कंत्राटी पद्धतीने साफसफाई काम करणाऱ्या महिलांनी ठिय्या मांडला आहे. महापालिकेने महिला दिनालाच महिलांचा अपमान केला असल्याचा संताप कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी व्यक्त केला.

विविध मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई महिला कामगारांनी रात्रभर महापालिकेसमोर रस्त्यावर झोपून आंदोलन केले. या वेळी बाबा कांबळे बोलत होते.

या वेळी महाराष्ट्र मजूर पक्षाचे अध्यक्ष भाऊसाहेब अडागळे, बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गंध, कष्टकरी कामगार पंचायतचे कार्याध्यक्ष बळीराम काकडे, महिला उपाध्यक्षा मधुरा डांगे, गौरी शेलार, मालन गवळी, मीना रंधवे, घरकाम महिला सभा अध्यक्षा आशा कांबळे आदींसह पदाधिकारी, सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाबा कांबळे म्हणाले की, पिपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये सोळाशे महिला कंत्राटी पद्धतीने साफसफाई, झाडलोट आदी प्रकारचे कामे करत आहेत. गेल्या वीस वर्षापासून या महिला काम करत आहेत. पूर्वी स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून हे काम केले जात होते. परंतु स्वयंरोजगार सहकारी संस्थांनी महिलांच्या पीएफ मध्ये घोटाळा केला. त्यांना किमान वेतन दिले नाही. यामुळे महानगरपालिकेच्या वतीने 8 प्रभागात निविदा काढून ही कामे मोठ्या ठेकेदारांना दिली. परंतु मोठ्या ठेकेदाराने देखील महिलांना किमान वेतन, समान वेतन न देता त्यांना अत्यंत तुटपुंज्या पगारावर राबवून घेतले. गेल्या चार वर्षापासून हा अन्याय सुरूच आहे. यात ठेकेदाराने एटीएम पासबुक स्वतःकडे ठेवून महिलांचे बँकेत खाते काडून त्यांच्या बँक खात्याचा दुरुपयोग केला.

याबाबत पिंपरी पोलीस स्टेशन येथे याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे.

कष्टकरी कामगार पंचायतिच्या वतीने वेळोवेळी आंदोलन, मोर्चे काढून आयुक्तांना निवेदन दिले. तसेच भाजपशासित पदाधिकाऱ्यांना देखील वेळोवेळी निवेदने दिली. परंतु आयुक्त आणि सत्ताधारी यांनी मात्र कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. यामुळे कचऱ्यामध्ये पैसा खाण्याची प्रवृत्ती बळावली असून राजकीय व्यक्तीच इतरांच्या नावाने ठेका चालवीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महिलांना न्याय देण्याची भूमिका प्रशासन आणि राजकीय नेत्यांची नाही. इमानेइतबारे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जात आहे. त्यामुळे महिलांना उदरनिर्वाहाचा प्रश्न पडला आहे. अनेकांना घरभाडे द्यायचे कसे हे समजेना, मुलांचे शिक्षण, आजारपण, कर्जाचे हफ्ते डोक्यावर टांगती तलवार म्हणून फिरत आहे. अशा वेळी हक्काचे काम देखील घालवले जात आहे. महापालिकेच्या व ठेकेदारांच्या या गैरकारभाराच्या विरोधात महिलांमध्ये संताप आहे. तो आज व्यक्त होत आहे. त्वरित या बाबत निर्णय न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा बाबा कांबळे यांनी दिला.

यांच्यावर कारवाई करावी

तसेच महापालिका, सिद्धिविनायक इंटरप्राईजेस, गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर, शुभम उद्योग, तिरुपती इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस, परफेक्ट फॅसिलिटी सर्व्हिसेस, हेमांगी एन्टरप्रायजेज, डीएम एंटरप्राइजेस या ठेकेदारांकडून कामगारांना मिळणारी रक्कम त्वरित मिळावी. अन्यथा या संस्थांच्या विरोधात देखील तीव्र आंदोलन छेडू असा इशारा बाबा कांबळे यांनी दिला.

ठेकेदाराच्या त्रासाने महिला कामगाराचा मृत्यू

ठेकेदार सफाई कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत आहे. त्यांना मानसिक त्रास दिला जात आहे. हा त्रास इतका वाढला की हिरामण यादव या सफाई कर्मचाऱ्यांचा आज दुर्देवी मृत्यू झाला. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सफाई कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. सफाई कर्मचाऱ्याचा झालेल्या मृत्यूला ठेकेदार व आयुक्त दोघांना जबाबदार धरून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.

या आहेत मागण्या

सर्व सफाई कामगार महिला, पुरुष पैकी कोणालाही कंत्राटी कामगारांना नवीन ठेकेदार कामावरून कमी करू नये. अर्ध वेळ कामास घेतल्यास पुढील दिवसाचा किमान वेतन प्रमाणे पगार द्यावा. कंत्राटी कामगारांना कामाच्या ठिकाणी जास्त कामे व अतिरिक्त कामे, मातीचा ढीग उचलणे हाताने, मैला उचलने व इतर अतिरिक्त कामे सांगण्यात येऊ नयेत. सफाई कंत्राटी कामगार महिलांना कामाच्या ठिकाणी होणारे शोषण, पिळवणूक थांबून कामाच्या ठिकाणी मोकळेपणा मिळाला पाहिजे. मागील वर्षाचे बोनस देण्यात यावे सफाई कामगाराचे बोनस थकित 18 ते 21 थकित बोनस देण्यात यावे. सफाई कामगारांना मनपाने कायमस्वरूपी कामावर घ्यावे. कंत्राटी पद्धत बंद करा. नवी मुंबईच्या धरतीवर सफाई कामगारांना घरकुल योजना राबविण्यात यावी. सफाई कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी.