रोहित आठवले
उद्योगनगरीत मागणी वाढत गेल्यावर ऑइलचा काळाबाजार आणि त्यातून घर भरणारे पिंपरी चिंचवडकरांनी पाहिले. आता ब्लॅक ऑईलचा ट्रेण्ड मागे पडून गार्बेज गोल्डने जोर धरला असून, शहरातील या कचऱ्यावर आपल्या घरात हिरवळ फुलविणारे बहरू लागले आहेत.
पिंपरी चिंचवडमधील कारखान्यांना पूर्वी ऑईलची गरज भासत होती. त्यातून या ऑईलचा काळाबाजार सुरू झाला. ब्लॅक गोल्ड म्हणून याकडे पाहिले जाऊ लागल्याने अनेकांनी यावर घरं भरली. पण नंतर तंत्रज्ञानात बदल होत जाऊन ही मागणी रोडावली. त्यामुळे याचा काळाबाजारही कमी झाला. पण शहरातील वाढती लोकसंख्या व नोकरीसाठी दाखल झालेल्यांच्या घरात कंपन्यांत तयार होणाऱ्या कचऱ्याला नेते मंडळींनी आपलंस करायला सुरुवात केली.
कचरा कोण उचलणार, तो नेऊन कोण टाकणार, त्यातून भंगार कोण वेगळे करणार, वेगळे केलेले भंगार डेपोतून बाहेर कोण आणणार, पुढे ते जालना आणि मुंबईला कोण पाठवणार असे सगळे ठेकेदार ठरलेले. यातून कचरा वेचकांच्या पदरी निराशाच. तर नागरिकांच्या पैशांवर कचरा प्रकल्पात सुरू असणाऱ्या मशीनचा चालू असलेला खरा कालावधी आणि कागदावरील कालावधी यातील तफावत याबाबत अनेकदा कुजबुज होत असते.
बऱ्याचदा याबाबत काही लोकांनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रसिध्दी माध्यमांतील सध्याचे उच्च पदस्य आणि लोकशाहीच्या चारही स्तंभांच्या तत्कालीन सदस्यांनी या कचऱ्याचा वेळोवेळी सुवर्ण वास घेतल्याने याला अद्यापपर्यंत वाचा फुटलेली नाही.
कचऱ्याचे वजन वाढवणे असो, १०० सदनिकांच्या पेक्षा बड्या सोसायटीचा कचरा उचलण्याचे बदलते धोरण असो सगळ्यांनी आपल्या ध्येय धोरणांचा कचरा केल्याने सामान्य नागरिकांना याबाबत काय सुरू आहे याचा मागमूस लागू दिलेला नाही.
कचऱ्यावरून मध्यंतरी शहरात गोळीबार झाला. मात्र, गोळीबार झालाच नाही किंवा गोळीबार कसा झाला हे सांगण्यात अनेक बारमध्ये बाटल्यांचा कचरा वाढत गेला आणि मुळमुद्दा बाजूला राहिला. या नशेची झिंग पिंपरी चौकातून प्रेमलोक पार्क आणि मरीन ड्राईव्ह पर्यंत पोहचल्याने त्यावर पुण्यात दर शुक्रवारी होणाऱ्या दादांच्या अनेक बैठकांमध्ये आरोप प्रत्यारोप झाल्याचे बोलले जाते.
कचऱ्यातून करियर करता येते सांगणारे पिंपरी चिंचवडमध्ये घंटागाडीचे वजन वाढविण्याचा ठपका बसल्याने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे ठाकले होते. पण गल्ली ते दिल्ली हातात असल्याने त्यांनी या आरोपांची धूळ पुसून टाकली.
कचरा मग तो शहराच्या डेपोत जमा होऊन न्यू pcmc च्या नाकातील केस जळणारा असो वा शहराच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जाळला जाणारा बायोमेडिकल वेस्ट असो त्याची राख सामान्यांच्या जेवणात मिसळली जात असताना ती आत्ता पर्यंत कोणत्याही प्रतिथयश प्रसिध्दी माध्यमांना दिसलेली नाही.
कचरा वेचकांचा कळवला असल्याचे सांगणाऱ्या अनेक स्वयंघोषित नेत्यांनी आता घंटागाडी पेक्षा मोठी एसी गाडी घेऊन शहरभर फिरण्यास सुरुवात केली आहे. पण या कचऱ्यातून मुलाबाळांचे पोट भरण्यासाठी झगणाऱ्यांना आत्तापर्यंत आपल्याही घरातून कचरा साठू शकतो अशी प्रगती साधता आलेली नाही.
अण्णा भाऊ साठे यांनी चितारलेल्या स्मशानातील सोने गोळा करताना हाताची बोटे गमावणाऱ्या भीमा प्रमाणे येत्या निवडणुकीत आपली सत्ता (नगरसेवक पद) रुपी बोट गमावण्याची वेळ तर येणार नाही ना हा विचार कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर घोंगवणाऱ्यानी करण्याची गरज आहे.
कचरा विलागिकरण, कचऱ्यासाठी नागरिकांना कंटेनर (प्लास्टिकचे छोटे डबे) देणे, यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाई देशपातळीवर पुरस्कार मिळविणे आणि त्यासाठी अक्कलेचा कचरा करून पैशांची उधळपट्टी करणे हे येत्या निवडणुकीत भोगावे लागणार हे विसरून चालणार नाही..