ठाणे : सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे, त्याचा वापर अतिशय जबाबदारीने करायला हवा. त्याचे जेवढे फायदे आहेत तर तेवढाच त्याचा गैरवापर सुद्धा होऊ शकतो, याचे भान ठेवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय जबाबदारीने या सोशल मीडियाचे तंत्र अवगत करून घेणे गरजेचे आहे. तसेच त्या माध्यमातून पुरोगामी विचार प्रभावीपणे समाजामध्ये घेऊन जायचे आहे. असे प्रतिपादन लॉयन डॉ. सुरेंद्र भोसले यांनी राज्य सोशल मीडिया तर्फे आयोजित एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी काढले.
या कार्यशाळेला ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शाखेतील पदाधिकारी आणि नवीन कार्यकर्ते यांनी चांगला प्रतिसाद दिला. राज्य सोशल मीडिया चे सदस्य श्री प्रसाद खुळे हे या कार्यक्रमाचे संयोजक होते तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य प्रा. प्रवीण देशमुख यांनी पुढाकार घेऊन कुमुद बंगल्यातील प्रशस्त हाॅलमध्ये या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यशाळेला राज्य सोशल मीडिया चे सदस्य असलेले सांगली येथील श्री वाघेश साळुंखे व पुणे येथील राहुल माने यांनी मार्गदर्शन केले. प्रा. प्रवीण देशमुख यांनी या कार्यशाळेच्या आयोजनामागची भूमिका आपल्या प्रास्ताविकात मांडली.
त्यानंतर राहुल माने आणि वाघेश साळुंखे यांनी दोन सत्रांमध्ये सोशल मीडिया फेसबुक व्हाट्सअप ट्विटर आदींसह अनेक ॲप्सचा वापर करताना त्याचा प्रभावीपणे वापर करताना काय काळजी घ्यायला पाहिजे, हे त्यातील अनेक बारकाव्यांसह समजावून सांगितले. त्याचबरोबर प्रत्तेक सहभागी कार्यकर्त्यांकडून त्याचे प्रात्यक्षिकही करून घेतले हे या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. सहभागी सर्वच कार्यकर्ते अतिशय उत्सुकतेने या माहीत नसलेल्या अनेक तांत्रिक बाबींना आत्मसात करत होते.
सोशल मीडियाच्या दैनंदिन वापराच्या ट्रिक्स देत प्रशिक्षणार्थींच्या प्रश्नांना प्रत्यक्षिकातून उत्तरे देण्यात आली. सोशल मीडिया हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी हे तंत्र आत्मसात करणे किती गरजेचे आहे, हे या कार्यशाळेतून एकदा पुन्हा अधोरेखित झाले.
कार्यक्रमाचे संयोजक श्रीप्रसाद खुळे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमात ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक वानखडे, राज्य सल्लागार समितीचे सदस्य डॉ. श्यामकांत जाधव, वैज्ञानिक जाणीवा प्रकल्पच्या राज्य कार्यकारिणी सदस्य किरणताई जाधव, ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य सुरेखाताई देशमुख यांच्यासह ठाणे जिल्यातील सुमारे ३० सदस्यांनी सहभाग घेतला.