समाजातील समृद्ध वर्गाने गरीब आणि शोषितांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावण्यासाठी काम करावे – डॉ. किशोर खिलारे

समाजातील समृद्ध वर्गाने गरीब आणि शोषितांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावण्यासाठी काम करावे - डॉ. किशोर खिलारे

पिंपरी चिंचवड : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आकुर्डीगाव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त शरण बहादूर यादव यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच आकुर्डी आकुर्डी येथील कार्यालयात ‘आम्ही भारताचे लोक आणि आमचे प्रजासत्ताक’ विषयावर डॉ. किशोर खिलारे (सहयोगी प्राध्यापक, यशवंतराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय,पिंपरी चिंचवड मनपा) यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

पक्षाच्या वतीने डॉ. किशोर खिलारे यांचा कोव्हीड-19 काळातील अतुलनीय आरोग्य सेवेबद्दल शाल आणि पुष्पगुच्छ देऊन तसेच क्रांतिकुमार कडुलकर यांचा ऑनलाइन ऑफिस व्यवस्थापन आणि अविनाश लाटकर, रंजिता लाटकर यांचा ऑफिस नूतनिकरणाबद्दल पुष्पगुच्छ देऊन कॉम्रेड गणेश दराडे, अपर्णा दराडे, शैलजा कडुलकर सत्कार यांनी केला..

समाजातील समृद्ध वर्गाने गरीब आणि शोषितांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावण्यासाठी काम करावे - डॉ. किशोर खिलारे

डॉ. किशोर खिलारे यांनी भारतीय प्रजासत्ताक भारताचा आढावा घेताना सांगितले की, “समाजातील आर्थिक विषमतेचे निर्मूलन का झाले नाही, धर्म आणि जातीचे पंथ देशापेक्षा स्वतःला मोठे समजत आहेत. समाजातील बंधुभाव आणि व्यक्ती स्वातंत्र्ये अबाधित राहिली पाहिजेत. कामगार शेतकरी आणि गोरगरीब मोठा वर्ग आक्रोश करत आहे.

आम्ही बरेच काही मिळवले आहे. औद्योगिक, आर्थिक परिस्थिती सुधारली आहे, अतिशय उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा देशात आहेत. मात्र, त्याचा लाभ कामगार शेतकरी, शेतमजूर, लाखो बेरोजगार युवक युवती, विद्यार्थ्यांना घेता येत नाही.

उपेक्षित वर्गाकडे पैसा उपलब्ध होत नाही. काही शेकडो धनवंतांची संपत्ती गुणकाराने वाढत आहे. आरोग्य सेवा महाग होत आहेत”. असे सांगून किशोर खिलारे पुढे म्हणाले की, “भारतीय संविधानातील उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी लोकाभिमुख चळवळी उभ्या कराव्या लागतील.

सामान्य लोकांना न्याय देऊन त्यांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी समृद्ध वर्गाने भारतीय सविधानाशी इमान राखून काम केले पाहिजे. राज्यकर्ता वर्ग शोषितांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असेल तर ती सविधानाशी बेईमानी ठरेल.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड सलीम सय्यद होते. अध्यक्षीय भाषणात कॉम्रेड सलीम सय्यद म्हणाले, “बाबासाहेबानी संविधान राष्ट्राला अर्पण करतात सांगितले होते की, राज्यकर्त्यांनी राज्य कारभार करताना जनतेची सर्व स्वप्ने पूर्ण होतील, याची काळजी घ्यावी. जर लोकशाही राज्यव्यवस्थेत व्यक्ती स्तोम वाढले, तर लोकशाही धोक्यात येईल. जनतेचा सामाजिक आणि आर्थिक उत्कर्ष सरकारांनी केला पाहिजे. विशिष्ट घटकासाठी सत्ता काम करताना अलीकडे दिसत आहे. संविधान हा आपला मोठा धर्मग्रंथ आहे. कुराण,बायबल,गीता, पुराण हे ग्रंथ आत्मिक सुखासाठी आहेत. देशात खूप मोठी आर्थिक प्रगती झाल्याचा गवगवा होत असला तरी ज्या बांगलादेशी लोकांच्या नावाने आपण टाहो फोडत असतो, त्या बांगला देशाचा जीडीपी आपल्यापेक्षा सर्वात जास्त आहे.”

त्याप्रसंगी गणेश दराडे, शरण बहादूर यादव, क्रांतिकुमार कडुलकर, अपर्णा दराडे, विनोद चव्हाण, शैलजा कडुलकर हे उपस्थित होते. प्रास्ताविक अमिन शेख यांनी केले. पूजा दोडमनी, मनीषा सपकाळे, यल्लमा कोलगवे, रंजिता लाटकर, गौतम शिंदे यांनी संयोजन केले, तर किसन शेवते यांनी आभार मानले.