Ahilyanagar : अश्विनी नांगरे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श सरपंच’ पुरस्काराने गौरव

Ahilyanagar : अश्विनी नांगरे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श सरपंच’ पुरस्काराने गौरव 

कर्जत : अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपे गावच्या (ता. कर्जत) सरपंच अश्विनी हरिश्चंद्र नांगरे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीने ‘राज्यस्तरीय आदर्श सरपंच’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. माहिजळगाव येथील सार्थक मंगल कार्यालयात रविवारी (दि. ७ डिसेंबर) हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १५ मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. खासदार विकास महात्मे होते. 

सरपंच अश्विनी नांगरे यांनी गावचे सरपंच पद भूषवित अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या. मूलभूत गरजांवर विशेष भर देत प्रथमत: ग्रामीण पाणीपुरवठा अविरत सुरु ठेवण्यासाठी शाश्वत पाणी साठा निर्मिती केली. त्यासोबत अद्ययावत पाणीपुरवठा वितरण प्रणाली निर्माण केली. गावठाण अंतर्गत रस्ते, पिढ्यानं पिढ्या रखडलेले पांदन रस्ते नवनिर्मित केले. १०० पेक्षा अधिक गरजूंना रेशनचे धान्य चालू केले. असे अनेक लोकहिताचे प्रश्न सोडवून गावच्या विकासात भर घातली.

ज्या मराठी शाळेची अवस्था अतिशय दयनीय झाली होती, तिचे नूतनीकरण केले. ‘माझे गाव, माझी शाळा’ असा संकल्प राबवून पटसंख्या वाढवण्यासाठी स्वतःच्या मुलाचा मराठी शाळेत प्रवेश घेतला. शाळेत पाणी व्यवस्था, स्वच्छतागृह सुविधा उपलब्ध करून शाळा डिजिटल केली. तसेच गावाला स्वच्छतेचा वसा दिला.

नांगरे यांचे भरीव कामगिरी 

“ग्राम सुधारणेचा मूलमंत्र, सज्जनांनी यावे एकत्र, संघटन हेच शक्तीचे सूत्र, ग्राम स्वराज्य निर्माण करी !” या तुकडोजी महाराजांच्या उक्ती प्रमाणे ग्राम स्वच्छतेवर त्यांनी भर दिला. गावातील मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्याबरोबरच बरेच वर्षे अर्धवट स्थितीत पडलेले तुळजाभवानी मंदिर पूर्ण केले. मारुती मंदिर नूतनीकरण केले, काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. यासाठी त्यांना उपसरपंच विनोद मोटे, अतुल जगताप व समस्त ग्रामस्थांची खंबीरपणे साथ मिळाली. ग्रामसचिवालयाची इमारतीचे नूतनीकरण केले. ज्या इमारतीत पावसात उभा रहायला जागा नसायची. सार्वजनिक सप्ताह वगैरे कार्यक्रमांसाठी भव्य सभामंडप निर्मिती करून दरवर्षी मंडपावर होणारा गावाचा अधिकचा खर्च वाचवला. वैयक्तिक लाभाचा विचार करता गोरगरिबांना १४० घरकुले, सुमारे ६३ गाय गोठे,  ९० च्या आसपास सिंचन विहीरीइत्यादी कोट्यावधी रुपयांच्या व्यक्तिगत लाभाच्या योजना प्रभावीपणे राबवल्या. विशेष करून ग्रामपंचायतला कुठल्याही प्रकारचे उत्पन्न नसताना या सार्वजनिक हिताच्या योजना राबावणे, तितके सोपे नव्हते, म्हणूनच त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानने त्यांना ‘राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार’ देऊन सन्मानित केले.

यावेळी बोलताना सरपंच अश्विनी नांगरे म्हणाल्या की, “असेच अविरत कार्य चालू ठेवून येणाऱ्या काळात सुपे गावाचा आदर्श गावांमध्ये प्रथम क्रमांक असेल. ” हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विचार मंचावरील सर्व मान्यवरांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली. 

समाज प्रबोधनकार प्राचार्य विक्रम कांबळे यांनी “पुरस्कार प्रेरणा देतात, प्रेरणेने राष्ट्र मोठे होते.” असे सांगत अहिल्यादेवी होळकरांचे कार्य आपल्या प्रभावी भाषणातून व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र गायकवाड यांनी केले, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष महारनवर यांनी मानले. यावेळी राज्यभरातून नागरिक उपस्थित होते.