खंडणी, अवैध सावकारी प्रकरणी अनिकेत हजारे आणि नाना वाळकेला अटक

खंडणी, अवैध सावकारी प्रकरणी अनिकेत हजारे आणि नाना वाळकेला अटक
  • सावकार नानासाहेब गायकवाड विरुद्ध केलेल्या तक्रारीमुळे आरोपींचा फिर्यादीलाच अडकवण्याचा डाव उघड

पुणे : औंधमधील आणखी एका हाय प्रोफाईल प्रकरणावर चतु:श्रृंगी पोलिसांनी सावकारी आणि खंडणी प्रकरणी कारवाई करुन अटक केली आहे. रामदास ऊर्फ नाना गोपीनाथ वाळके (वय ३७ रा. जय गणेशनगर, विधातेवस्ती, औंध) आणि त्याचा साथीदार अनिकेत रमेश हजारे (वय 35, रा. ए/31 हजारे सदन, लुंकड हॉस्पिटलजवळ, दापोडी, पिंपरी-चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार ऑगस्ट २०१५ ते १० डिसेंबर २०२१ दरम्यान घडला आहे.

बेकायदेशीररित्या सावकारी पद्धतीने पैसे देवून अवास्तव पद्धतीने व्याज आकारणी करत तसेच खंडणी मागत ती न दिल्यास सामाजिक बदनामी व मानसिक छळ केल्याप्रकरणी पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे स्वप्नील बालवडकर (रा. बालेवाडी) यांनी तक्रार केली होती. त्यानूसार वाळके आणि हजारे यांच्या विरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी नाना वाळके याच्याकडून ३ कोटी ५० हजार रुपये घेतले होते. या रक्कमेच्या मोबदल्यात फिर्यादी यांनी अनिकेत हजारे यांच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये बँकेद्वारे ३ कोटी २ लाख २७ हजार रुपये व रोखीने २ कोटी ७ लाख ७३ हजार रुपये असे एकूण ५ कोटी १० लाख रुपये परत केले आहेत. त्यानंतर फिर्यादी यांच्याकडे अजून ४ कोटी ७५ हजार रुपयांची मागणी करत अनिकेत हजारे याने तक्रारदार यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. तक्रारदारांनी वकीलांमार्फत माहिती मागितली की, तुम्ही कसले पैसे मागत आहे, तर हजारेने कोणतीही माहिती दिली नाही. उलट तक्रारदारांनाच अनिकेत हजारे याने फिर्यादीच्या नावावर असलेल्या गाड्यांचे आर सी बुक, चेक घेतले. तसेच त्यांच्याकडून बळजबरीने प्रॉमिसरी नोट लिहून घेतली.

फिर्यादी यांच्याविरुद्ध खोट्या बातम्या प्रकाशित केल्या. तसेच नानासाहेब गायकवाड विरुद्ध एफआयआर दाखल करतो काय, तुझ्याकडे बघतोच. म्हणत शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर नाना वाळके यांनी फिर्यादी यांना तू अनिकेत हजारे याला पैसे देऊन विषय संपव. नाही तर तो इतर लोकांना एकत्र आणून तुझ्याविरुद्ध १० ते १५ खोट्या तक्रारी दाखल करीन, तुझा गेम टाकायला कमी करणार नाही. स्वत:चा व कुटुंबाचा विचार कर, अशी धमकी देऊन फिर्यादीची आर्थिक पिळवणूक केली. या प्रकारानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. चतु:श्रृंगी पोलिसांनी खंडणी व सावकारी अधिनियमाखाली गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा तपास सुरु आहे.