Covid-19 : पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले आणखी १२ करोनाबाधित रूग्ण

Covid-19 : पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले आणखी १२ करोनाबाधित रूग्ण

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. एकाच दिवसात तब्बल १२ करोनाबाधित आढळल्याने सध्या शहरात भीतीचे वातावरण आहे. पिंपरी चिंचवडमधील करोनाबाधितांचा संख्या ७९ वर पोहचली आहे. आतापर्यंत २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. करोनामुळे आज ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. दरम्यान, आज सापडलेल्या १२ करोना बाधितांमध्ये लहान मुले, महिला, पुरुष यांचा समावेश असल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणूने आणखीच फास घट्ट आवळला असून एकाच दिवसात तब्बल १२ जण करोना पॉजीटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. यात महिला, लहान मुले आणि पुरुष आहेत अशी माहिती महानगर पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. त्यामुळे शहरातील करोना बाधितांची संख्या ७९ वर पोहचली असून चिंता वाढली आहे. करोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना करोना झाल्याचं सांगण्यात येत आहे.

आत्तापर्यंत एकूण २१ जणांना करोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आलं असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत चार जणांचा करोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. दरम्यान, १२ जणांवर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांचे रात्री उशिरा अहवाल आले आहेत. नागरिकांनी बाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य कराव अस आवाहन करण्यात येत आहे.