आप्पा तांबे यांचा प्रभाग ३३ मध्ये बैठकांचा धडाका

आप्पा तांबे यांचा प्रभाग ३३ मध्ये बैठकांचा धडाका

पिंपरी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूकीची तारीख कधीही जाहिर होऊ शकते. त्याच अनुषंगाने भाजपचे युवा नेते देविदास आप्पा तांबे यांचा बैठकांचा धडाका सुरू आहे. आप्पा तांबे प्रभाग क्रमांक ३३ मधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने इच्छुक आहेत.

रहाटणीतील प्रभाग क्रमांक ३३ हा बैठी घरे तसेच उच्चभ्रू सोसायटी अशा संमिश्र परिसरात पसरला आहे. या परिसरातील नागरिकांशी आप्पा तांबे यांनी थेट संपर्क सुरू केला असून विविध हाऊसिंग सोसायटी, कॉलनी व महिला बचत गटांच्या बैठकांवर तांबे यांनी जोर लावला आहे. या बैठकीत नागरिक तांबे यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा करत आहेत. यावेळी तांबे यांच्या वतीने महिला व तरूणांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांची माहिती देण्यात येत आहे. याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत आप्पा तांबे म्हणाले की, आत्ताच्या प्रभाग क्रमांक ३३ मधील विविध नागरी समस्या सोडवण्याचे व सर्वतोपरी विकास करण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या वतीने नेहमीच सुरू आहे. त्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असून या परिसराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

या संदर्भात अधिक बोलताना तांबे पुढे म्हणाले की, या भागात राहणाऱ्या महिलांना बचत गटांच्या मार्फत एकत्र करण्यासाठी आमचा अविरत प्रयत्न सुरू आहेत. बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार देण्यात आला आहे. तसेच विविध सरकारी योजनांची माहिती महिलांना देण्यात येत असून यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग मिळत आहे.

दरम्यान, देविदास आप्पा तांबे हे संस्थापक-अध्यक्ष असलेल्या श्री सरपंच फाउंडेशनच्या माध्यमातून या आधीही अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्याचा बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला आहे. असे तांबे यांनी लोकमराठी न्यूजशी बोलताना सांगितले.