- पिंपरी चिंचवड मातंग समाजाच्या वतीने पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांची भेट घेत तीव्र मागणी
पिंपरी : चिंचवड येथील अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार व अत्याचार झालेल्या घटनेचा पिंपरी चिंचवड शहरातील सर्व मातंग समाज बांधवानी एकत्रित येऊन तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला तसेच उर्वरित दोन आरोपीना तात्काळ अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून कठोरात कठोर शिक्षा करावी आणि पिडीत मुलीला व तिच्या परिवारास योग्य तो न्याय मिळवून देत त्या परिवारास पोलिस संरक्षण द्यावे यासाठी आज सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने पीडित कुंटुबाला पोलिस संरक्षण देणे, उर्वरित दोन आरोपीना तात्काळ अटक करून त्यावर कठोर कारवाई करणे तसेच अशा घडणाऱ्या घटनांना पायबंद घालणे, पीडित मुलीला न्याय मिळवून देणे अश्या मागण्या केल्या.
या निवेदनाचा स्वीकार करत पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी तात्काळ आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच झालेल्या प्रकार हा निंदनीय असून यात कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही. तसेच आजपासुन पीडित कुंटूंबासाठी पोलीस संरक्षण देण्याचे आश्वासन दिले. यावेळी समाजातील जेष्ठ नेते शंकरभाऊ तडाखे, भाऊसाहेब अडागळे, संदीपान झोंबाडे,अमित गोरखे, अनिल सौंदडे,संजय धुतडमल, सतीश भवाळ, संजय ससाणे, अरुण जोगदंड, नाना क्षीरसागर,रमेश शिंदे,दशरथ कांबळे, नेताजी शिंदे, कोमल रमेश शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
● काय आहे घटना……..
पिंपरी चिंचवड मधील चिंचवड येथील एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार झाल्याची घटना शुक्रवारी दि. २७ ऑगस्ट रोजी रात्री चिंचवड परिसरात घडली होती, बंद पडलेल्या बांधकाम साईटवर अल्पवयीन मुलीला नेऊन तिथे तीन नराधमांनी तिच्यावर सामुहिक अत्याचार केला होता, तसेच आरोपींनी मुलीला कुठेही वाच्यता केल्यास तिच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच दुष्कृत्य करतानाचा व्हिडिओ वायरल करण्याची धमकी दिली होती. या घटनेत एकूण तीन आरोपीवर गुन्हा दाखल आहे. त्यापैकी एक आरोपी अटकेत असून तो अल्पवयीन आहे, या गुन्ह्यातील इतर दोन आरोपी आनंद गायकवाड आणि गौरव वाघमारे हा सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी खून, चोरी, जबरी चोरी, घरात घुसून विनयभंग असे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत.