पिंपरी : शासकिय कर्मचारी यांची बदली होणे हे क्रमप्राप्त असते. कामाचा तो एक भाग असतो. मात्र .. काही शासकिय अधिकारी असे असतात की, त्यांची इतरत्र बदली होणे, हि गोष्ट मनाला पटणे. तेथील त्यांचे सहकारी तसेच संपर्कात आलेली मंडळी यांना काही काळासाठी तरी कठीण होऊन जाते. असेच काहीसं .. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त राजाराम (तात्या) पाटील यांच्या बाबतीत पाहावयास मिळत आहे. सहायक पोलीस आयुक्त पाटील यांची बदली कोल्हापूर या ठिकाणी झाल्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहकारी यांना अक्षरशः गहिवरुन आले असल्याचे चित्र आहे..
पोलीस म्हटलं की, सर्वसामान्यांच्या काळजात धस्स झाल्याशिवाय राहत नाही. करडी नजर, आवाजातील कणखरपणा, चालण्याची बोलण्याची वेगळी लकब .. असे काहीसे चित्र असते. गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलीस खात्यातील अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे या गोष्टी अंगभुत अवगत असणे गरजेचे असते. किंवा पुढे काही काळानंतर अनुभवाने त्यांना या गोष्टी अवगत होत असतात..
मात्र, साधी राहणीमान आणि उच्च विचार .. असे ज्या व्यक्तींविषयी संबोधले जाते. त्यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांच्या नावाचा आवर्जुन उल्लेख निघाल्याशिवाय राहणार नाही. कारण स्वतःचा सख्ख्या भाऊ दिवंगत आर. आर. पाटील (आबा) हे बारा वर्ष राज्याचे गृहमंत्री असताना देखील त्यांनी या गोष्टींचे कधी भांडवल केले नाही. पोलीस खात्यात अगदी गेली 33 वर्ष इमाने इतबारे आपली नोकरी करीत आहेत. शांत, संयमी आणि इतरांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर आणि मदतीसाठी धडपडणारे अधिकारी म्हणुन त्यांची पोलीस दलात ओळख आहे. कोरोनाच्या बिकट प्रसंगी त्यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील कोरोना बाधित तब्बल 300 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी दिवस रात्र एक केला. स्वतःच्या कुटंबातील सदस्य कोरोनाच्या विळख्यात असताना देखील अशा वेळी स्वतः खचुन न जाता कुटंबाची तसेच आपल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची कुटंबाप्रमाणे काळजी घेतली. या सर्व गोष्टीचे साक्षीदार त्यांचे सहकारी आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवार (ता.5) रोजी पिंपरी चिंचवड शहराला भेट दिली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांसाठी थेट संवाद साधण्यासाठी आयुक्तालयाच्या वतीने सुरु केलेल्या सोशल मिडीया साईट पेजचे उदघाटन उपमुख्यमंत्र्यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सहायक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांचा देखील निरोप समारंभ निमित्त सत्कार सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला.
सहायक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांच्या विषयी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, स्वतःचा सख्ख्या भाऊ राज्याचा गृहमंत्री असताना पाटील त्यांनी कधी या गोष्टीचे भांडवल केले नाही. नेहमी शांत स्वभाव असलेले पाटील आपल्या कामाबाबत देखील तितकेच चोख आहेत. आपलं काम भलं.. आणि आपण भलं.. अस त्यांच काम.. नाहीतर.. कुणाचा दुरचा नातेवाईक गृहमंत्री असला असता म्हणजे तो बहाद्दर अख्ख मंत्रालय आपल्या खिशात असल्यासारख्या अविर्भावात वावरत असतो. परंतु पाटील यांच्यासारखी सच्ची माणसं पोलीस दलात फार कमी पाहावयाला मिळतात. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या मनापासुन शुभेच्छा..