अयोध्या, (लोकमराठी) : अयोध्या (उत्तर प्रदेश) प्रकरणाची सुनावणी पुर्ण झाली असून सुप्रीम कोर्टाचा निकाल कधी लागू शकतो. त्यामुळे या पार्श्वभूमीवर अयोध्येत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रात पोलिसांनी शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन जनतेला केले आहे.
अयोध्या प्रकरणावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. येत्या काही दिवसांत याविषयी निकाल अपेक्षित असल्यामुळे उत्तर प्रदेशसह महाराष्ट्र सरकारने हा संवेदनशील विषय हाताळण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे आता शहर परिसरात नागिरकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे. तसेच कोणत्याही विषयावर मीडिया डिबेट घेण्यासही मज्जाव केला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अंजू झा यांनी 31 ऑक्टोबर रोजी या संदर्भात आदेश दिले आहेत.
पोलिसांचे शांततेचे आवाहन
दरम्याम, महाराष्ट्रातही या निकालाच्या पार्श्वभूमीवर कोणतिही अप्रीय घटना घडू नये, याची काळजी घेतली जात आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी प्रसिद्ध केले एक निवेदन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या निवेदनात म्हटले आहे की, माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून येत्या काही दिवसांत रामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिद या संवेदनशील विषयावर निकाल अपेक्षित आहे. न्याय व्यवस्थेवर तमाम भारतीयांचा विश्वास आहे. तरीही न्यायालयाचा निर्णय पाळणे सर्व भारतीयांना बंधनकारक आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही भडक विधान करणे, तसेच प्रतिक्रिया देणे, पत्रकबाजी करणे टाळावे. यामुळे जर कायदा सु-व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर, संबंधितावर कडक कारवाई केली जाईल. या संदर्भात सोशल मीडियावर निकालाच्या अनुषंगाने कोणाच्या ही भावना दुखावतील, असे मेसेज देऊ नयेत. जातीय दंगल भडकेल, असा कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ शेअर करू नये किंवा फडक फोटो प्रसारित करू नये. सर्वांनी शांतता आणि सलोखा राखावा, असे आवाहन पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.