शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष व माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांच्या विरुद्ध धर्मादाय आयुक्तांचा मनाई आदेश

शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष व माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांच्या विरुद्ध धर्मादाय आयुक्तांचा मनाई आदेश

पिंपरी : शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ काळेवाडी या संस्थेच्या मालमत्तेचे कोणत्याही प्रकारचे नुकसान करू नये असा मनाई आदेश पुणे विभागाचे अतिरिक्त धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी दिलेला आहे.

दरम्यान, शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक ९ जून २०१९ रोजी संपन्न झाली. वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन संचालक मंडळ निवडले आहे. संस्थेचे अध्यक्ष म्हणून चंद्रकात तापकीर, सचिवपदी मल्हारीशेठ तापकीर व इतर पदाधिकारी यांची कार्यकारिणी निवड करण्यात आलेली आहे.

संस्थेच्या वतीने कै श्री भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर, श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय, एल.बी.टी. इंग्लिश मेडियम स्कूल,तापकीरनगर काळेवाडी, पुणे व श्री भैरवनाथ माध्यामिक विद्यालय, मु.पो.ओझर्डे.ता.मावळ जि.पुणे ह्या शाळा चालविण्यात येतात.

परंतु संस्थेचे माजी अध्यक्ष मच्छिंद्र तापकीर हे नवीन संचालक मंडळाला कामकाजात अडथळे आणण्याचा व संस्थेच्या मालमत्तेला हानी पोहचवण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे संस्थेचे सचिव मल्हारीशेठ तापकीर, संचालक शशिकांत तापकीर व महेंद्र बामगुडे यांनी मच्छिंद्र तापकीर यांना ४१ ई कलमानुसार मनाई करावी असा विनंती अर्ज न्यायालयात दाखल केला होता.

सदर प्रकरणात न्यायालयाने दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून १५ सप्टेंबर २०२० रोजी मल्हारीशेठ तापकीर यांचा अर्ज मंजूर करून मच्छिंद्र तापकीर यांना मनाई केलेली आहे.

सदर संस्थेच्या कामकाजाबाबत नियमानुसार बदल अहवाल न्यायालयात दाखल करण्यात आलेला आहे. कोणताही हक्क अथवा अधिकार नसताना संस्थेच्या बनावट लेटरपॅडवर मच्छिंद्र तापकीर हे पत्र व्यवहार करीत आहे. याबाबत सक्षम प्राधिकारी यांच्याकडे संस्थेने तक्रारी दाखल केल्याचे सचिव मल्हारीशेठ तापकीर यांनी सांगितले.