शहरातील दुचाकी चोरून वेगवेगळ्या जिल्ह्यात विक्री करणाऱ्या टोळीचा चिखली पोलीसांनी केला पर्दाफाश ; ६१ दुचाकी हस्तगत

शहरातील दुचाकी चोरून वेगवेगळ्या जिल्ह्यात विक्री करणाऱ्या टोळीचा चिखली पोलीसांनी केला पर्दाफाश ; ६१ दुचाकी हस्तगत

पिंपरी, ता. १६ : चिखली, पिंपरी, निगडी अशा शहरातील दुचाकी वाहनांची चोरी करुन खानदेश व मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात विक्रीसाठी पाठविणाऱ्या टोळीचा चिखली पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे हि टोळी मौजमजा करण्यासाठी वाहन चोरुन त्या वाहनांची बनावट कागदपत्र तयार करुन ती वाहने विक्री करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परीषदेत याबाबत माहिती दिली.

पोलीसांनी या टोळीकडुन एकुण ६१ दुचाकी वाहने असा एकुण १९ लाख २२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोविंद मुलचंद सोलंकी (वय – २५, सध्या रा. अंजिठा नगर, पत्र्याचे शेड चिंचवड, मुळगाव-छाप्रा पोस्ट छोटाटिगरीया, ता. जि. देवास, मध्यप्रदेश), संदेश उर्फ संजय अंकुश जाधव (वय- २८, रा. गोकुळ हौसिंग सोसायटी, यादव यांचे घर, मोरेवस्ती, चिखली), सद्दाम अब्दुल शेख (वय- २६, रा. ताम्हाणे वस्ती, विठ्ठल रुक्मिणी मंदीरा जवळ, ओम साई सोसायटी, चिखली), आदिनाथ अशोक राजभोज (वय- १९, रा. अजिंठा नगर, पत्र्याचे शेड, पाण्याच्या टाकीजवळ, निगडी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

शहरात वाहन चोरीच्या घटना वाढत असताना चोरट्यांना अटक करुन कारवाई करण्यासाठी पोलीसांनी तपास यंत्रणा अधिक गतीमान केली आहे. त्या अनुषंगाने चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस नाईक विश्वास नाणेकर आणि पोलीस नाईक चंद्रशेखर चोरघे हे पेट्रोलींग करीत असताना माहिती मिळाली की, दोन दुचाकी चोरटे बुलेट वरुन स्पाईन रोड येथील जॉगर्स पार्क येथे येणार असुन त्यांच्या कडे चोरलेल्या दुचाकी आहेत. मिळालेल्या माहितीची खात्री झाल्यानंतर पोलीसांनी दुचाकी मोठ्या शिताफिने त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बुलेट (एमएच १४ जेएफ ४९९९) गाडी विषयी व कागदपत्राबाबत चौकशी केली असता त्यांनी ती बुलेट गाडी चिखलीतील कृष्णानगर भागातील शांती सदन सोसायटीच्या पार्किंग मधुन चोरली असल्याचे पोलीसांना सांगितले.

पोलीसांनी त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या इतर दोन साथीदाराच्या मदतीने दुचाकी चोरी केली असल्याचे कबुल करीत साथीदारांची नावे सांगितली. चोरीच्या घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चेतन सावंत, पोलीस नाईक चंद्रशेखर चोरघे, पोलीस नाईक विश्वास नाणेकर, पोलीस नाईक विपुल होले यांच्या पथकाला खाजगी वाहनाने लातुर, नांदेड, परभणी, अहमदनगर, धुळे व जळगाव या जिल्ह्यात रवाना केली. पथकाने विविध जिल्ह्यातुन तसेच स्थानिक परीसरात शोध मोहिम राबवुन एकुण चोरलेली ६१ दुचाकी वाहने जप्त करीत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.

कागदपत्रे दाखवुन वाहनांची करा वाहतुक – पोलीस आयुक्त

आपले वाहन एखाद्या जिल्ह्यातुन दुसऱ्या जिल्ह्यात ट्रॅव्हल्स गाडीमधुन घेवुन जायचे असेल तर प्रथम त्या वाहनांची मुळ कागदपत्रे ट्रॅव्हल्स कंपनीच्या संबंधीत अधिकारी यांनी तपासणी करणे आवश्यक आहे. तसे केले नाही ..तर ट्रॅव्हल्स कंपनीच्या व्यवस्थापकांना सह आरोपी करुन त्यांच्यावर देखील कारवाई केली जाणार असल्याचे संकेत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिले आहेत. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील यांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार, चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक विवेक कुमटकर, सहायक पोलीस फौजदार आनंद चव्हाण, पोलीस हवालदार चेतन सावंत, सुनिल शिंदे, बाबा गर्जे, किसन वडेकर, पोलीस नाईक चंद्रशेखर चोरघे, विश्वास नाणेकर, विपुल होले, गणेश टिळेकर, कबीर पिंजारी, महिला पोलीस नाईक नुतन कोंडे, पोलीस शिपाई संतोष सपकाळ यांच्या पथकाने हि कामगिरी केली आहे.