हडपसर, ता. ३ सप्टेंबर (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थी व शिक्षकांमध्ये संशोधन संस्कृती रुजवण्यासाठी आविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करून नाविन्यपूर्ण आणि अभिनव विचारांना प्रोत्साहन दिले आहे. तसेच शैक्षणिक प्रतिभेच्या अभिव्यक्तीची संधी देवून शैक्षणिक क्षेत्रातील परस्परसंवादाला प्रोत्साहन दिले आहे. हा उपक्रम वैशिष्ट्यपूर्ण असून त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह निर्माण झाला आहे. दोन वर्षानंतर हा उपक्रम विविध महाविद्यालयांमध्ये राबवला जात आहे.
रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमधील रिसर्च सेल (RAPC), आय.क्यू.ए.सी. सेल आणि स्टुडन्ट टीचर असोसिएशन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी आविष्कार संशोधन स्पर्धेवर आधारीत कार्यशाळा घेण्यात आली. डॉ. रंजना जाधव, शैक्षणिक संशोधन समन्वयक, स्टुडन्ट टीचर असोसिएशन सेलचे चेअरमन यांनी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पहिले. या उपक्रमासाठी महाविद्यालयातील विविध विद्याशाखांतील विद्यार्थ्यांनी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन अँड इनक्युबेशन सेंटरला भेट देऊन नाविन्यपूर्ण आविष्कारच्या कल्पना आत्मसात केल्या.
रसायनशास्त्र विभागातील डॉ. गुरमीत वधवा यांनी आविष्कार संशोधन स्पर्धेसंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.रंजना जाधव यांनी केले. तर आभार डॉ. एम. एन. रास्ते यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल पवार यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा. संजय जडे, डॉ. एम.एन.रास्ते, डॉ.सुनिल खुंटे, सर्व विभागाचे विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.