पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी नगरसेवक अजित गव्हाणे (Ajit Gavhane) यांची आज नियुक्ती करण्यात आली. तर युवक शहराध्यक्षपदी इम्रान शेख (Imran Shaikh) आणि महिला शहराध्यक्षपदी प्रा. कविता आल्हाट (Kavita Alhat) यांना संधी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. याशिवाय, शहरातील तीन विधानसभानिहाय कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनेत फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहराध्यक्षपदाच्या दोन टर्म पूर्ण झालेल्या संजोग वाघेरे यांना पदमुक्त करण्यात आले. त्यांच्या जागी गव्हाणे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने अजित गव्हाणे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. मागच्या वर्षी महापालिका विरोधी पक्षनेतेपदासाठी गव्हाणे प्रबळ दावेदार होते. पण, पक्षाने गव्हाणे यांच्याकडे विरोधी पक्षनेते पदापेक्षा संपूर्ण शहराची जबाबदारी दिली आहे.
शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची नगरसेवक पदाची चौथी टर्म आहे. त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. दरम्यान, तीनही विधानसभा मतदारसंघनिहाय कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक प्रशांत शितोळे आणि भोसरी मतदारसंघातील नेहरूनगर येथील नगरसेवक राहुल भोसले यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तर, युवकच्या कार्याध्यक्षपदी पिंपरी मतदारसंघातून लिंकरोड येथील निलेश निकाळजे, चिंचवड मतदारसंघातील प्रसन्न डांगे आणि भोसरीतील योगेश गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला कार्याध्यक्षपदी चिंचवड मधील ज्योती गोफणे, काळभोरनगर येथील सविता धुमाळ आणि सांगवीतील उज्जवला ढोरे यांची निवड करण्यात आली आहे.